दोघांनी कमाईच्या प्रयत्नात ३७ लाख गमावले; ऑनलाईन फसवणुकीच्या २ घटना
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 18, 2024 18:35 IST2024-04-18T18:35:33+5:302024-04-18T18:35:42+5:30
अशाच प्रकारे कोपर खैरणेत राहणाऱ्या श्वेता चव्हाण यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून नफा कमवण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.

दोघांनी कमाईच्या प्रयत्नात ३७ लाख गमावले; ऑनलाईन फसवणुकीच्या २ घटना
नवी मुंबई : शेअर मार्केट तसेच टास्कच्या बहाण्याने दोघांच्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये एकूण ३६ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी रबाळे व कोपर खैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत असून त्यामध्ये अनेकांचे बँक खाते रिकामे होत आहे. सोशल मीडियावरील फसव्या आमिषांना बळी पडून हे प्रकार घडत आहेत. अशाच प्रकारे गोठीवली व कोपर खैरणे येथील दोघांची ऑनलाईन फसवणूक झाली असून त्यामध्ये एकूण ३६ लाख ७३ हजार रुपये अज्ञातांनी हडपले आहेत. गोठीवली येथे राहणाऱ्या मुकेश नांदिवडेकर यांना पार्ट टाईम नोकरीतून पैसे कमवण्याचा मॅसेज आला होता.
त्यामधील लिंकला त्यांनी प्रतिसाद दिला असता कंपन्यांना रेटिंग देऊन पैसे कमवण्याचा सल्ला देण्यात आला होता. यासाठी त्यांना सुरवातीला काही प्रमाणात नफा देखील देण्यात आला. त्यामुळे संबंधितांवर विश्वास बसल्याने त्यांनी पुढील टास्कसाठी १७ लाख ७७ हजार रुपये भरले होते. त्यानंतर मात्र अधिक पैशाची मागणी होऊ लागली व घेतलेले पैसेही परत करण्यास टाळाटाळ होऊ लागली. यावरून त्यांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच प्रकारे कोपर खैरणेत राहणाऱ्या श्वेता चव्हाण यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून नफा कमवण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी १८ लाख ९६ हजार रुपये भरले होते. त्यानंतर देखील कोणताही मोबदला न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी कोपर खैरणे पोलिसांकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.