बोगस डॉक्टर शांताराम आरोटे गजाआड

By Admin | Updated: February 10, 2016 03:17 IST2016-02-10T03:17:00+5:302016-02-10T03:17:00+5:30

पोलिसांनी बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम सुरू केली असून नेरूळ सेक्टर ६ मधील दत्तात्रय आगदे नंतर दारावेमधील शांताराम आरोटे यालाही अटक केली आहे

Bogus doctor Shantaram has been accused | बोगस डॉक्टर शांताराम आरोटे गजाआड

बोगस डॉक्टर शांताराम आरोटे गजाआड

नवी मुंबई : पोलिसांनी बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम सुरू केली असून नेरूळ सेक्टर ६ मधील दत्तात्रय आगदे नंतर दारावेमधील शांताराम आरोटे यालाही अटक केली आहे. बिहारमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची बोगस पदवी तयार करून तो १५ वर्षे या परिसरात दवाखाना चालवत होता.
नवी मुंबईमधील बोगस डॉक्टरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेरूळमधील बोगस डॉक्टर दत्तात्रय आगदे याने चुकीचे उपचार केल्यामुळे व्यवसायाने वकील असणाऱ्या उत्तम आंधळे यांचा मृत्यू झाला होता. आंधळे यांच्या परिवारातील सदस्यांनी याविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे अल्फांसो यांनी बिहारमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मुझफ्फरपूरमधून कागदपत्रांची सत्यता पडताळणी केली असता सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे निदर्शनास आले होते. यानंतर २५ नोव्हेंबरला आगदेला अटक केली होती.
आगदेला अटक केल्यानंतर पोलिसांनी बिहारमधून पदवी मिळविलेल्या सर्व डॉक्टरांची माहिती महापालिकेकडून मागितली होती. शहरात ५ जणांनी बिहारमधून पदवी मिळविली असल्याचे निदर्शनास आले होते. या सर्वांची कागदपत्रे पालिकेकडून घेवून त्याची सत्यता तपासण्यासाठी बिहारमधील आंबेडकर विद्यापीठामध्ये पाठविली होती. दारावे गाव सेक्टर २३ मधील युनिक होम अपार्टमेंटमध्ये सन २००० पासून दवाखाना चालविणाऱ्या शांताराम नामदेव आरोटे याची पदवी बनावट असल्याची माहिती विद्यापीठाने दिली. यानंतर पोलिसांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार यांच्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्यास सांगितले. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश निकम यांनी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आरोटे याच्या दवाखान्यात जावून त्याच्या कागदपत्रांची छाननी केली. सर्व कागदपत्रे खोटे असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

जुगार अड्ड्यानंतर आता बोगस डॉक्टर
परिमंडळ एकचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. जुगार व मटका अड्डे बंद केल्यानंतर आता शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडली आहे. शहरातील बोगस डॉक्टरांचा शोध सुरू केला असून जे आढळतील त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाणार आहे.

शहरातील बोगस डॉक्टरांची पडताळणी करण्यासाठी सर्व वैद्यकीय व्यावसायिकांच्या कागदपत्रांची पुन:पडताळणी करावी असे नवी मुंबई महापालिकेस कळविले आहे. नागरिकांनीही त्यांना शहरात बोगस डॉक्टर व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली तर पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी.
- शहाजी उमाप, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १

Web Title: Bogus doctor Shantaram has been accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.