69 प्रवाशांना घेऊन निघालेली लाँच अचानक बंद पडली अन्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 23:05 IST2019-11-21T23:05:03+5:302019-11-21T23:05:25+5:30
तासाभराने मिळालेल्या मदतीनंतर सुखरूप सुटका

69 प्रवाशांना घेऊन निघालेली लाँच अचानक बंद पडली अन्...
उरण : उरण मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावर ६९ प्रवाशांना घेऊन निघालेली सावित्री लाँच भरसमुद्रात बिघाड झाल्याने बंद पडली. त्यामुळे या लाँचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. तासाभराने दुुसºया लाँचच्या मिळालेल्या मदतीनंतर प्रवाशांची सुखरूप सुटका झाली.
उरण-मोरा येथून सकाळी १०:३० वाजता सावित्री लाँच ६९ प्रवाशांना घेऊन भाऊचा धक्काकडे रवाना झाली होती. निम्म्याहून अधिक सागरी अंतर पार केल्यानंतर अचानक मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ६९ प्रवाशांना घेऊन निघालेली प्रवासी लाँच भरसमुद्रात बंद पडली. यामुळे प्रवाशांमध्ये चांगलीच घबराट पसरली होती.
दरम्यान, लाँचचालकाने मदतीसाठी संस्थेच्या मुंबई कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर तासाभराने शालीमार लाँच मदतीसाठी धावून आली. ६९ प्रवाशांना शालीमार लाँचने भाऊचा धक्का येथे सुखरूप पोहोचवले असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक पी. बी. पवार यांनी दिली.