खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीसह जैवविविधता आली धोक्यात

By नामदेव मोरे | Published: March 21, 2024 12:42 PM2024-03-21T12:42:49+5:302024-03-21T12:43:10+5:30

विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल : पर्यावरणप्रेमींच्या तक्रारींकडेही होतेय दुर्लक्ष

Biodiversity including mangroves along the bay is under threat | खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीसह जैवविविधता आली धोक्यात

खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीसह जैवविविधता आली धोक्यात

नवी मुंबई : नवी मुंबईला दिवा ते दिवाळेपर्यंत २२ किलोमीटरचा  समृद्ध खाडीकिनारा लाभला आहे. खारफुटीच्या जंगलासह मुबलक प्रमाणात जैवविविधता  लाभली आहे. परंतु, सद्य:स्थितीमध्ये करावे, वाशीसह अनेक ठिकाणी खारफुटीची कत्तल केली जात आहे. पाणथळ क्षेत्र नष्ट केली जात असून, पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. दक्ष नागरिकांनी पर्यावरण संवर्धनासाठी लढा सुरू केला असून, त्यांच्या तक्रारींकडेही शासन यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात आहे. 
पामबीच रोडवर टी .एस. चाणक्य जवळील तलावामध्ये प्रत्येक वर्षी हजारो फ्लेमिंगो पक्षी वास्तव्यासाठी येत असतात.  पक्षीनिरीक्षक येथे फ्लेमिंगोचा अभ्यास करण्यासाठी येतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल करण्यात आली आहे. तलावाचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी प्रत्येक रविवारी येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे.   
हा प्रश्न फक्त करावे व एनआरआय परिसरापुरता मर्यादेत राहिलेला नाही.  दिवा ते  दिवाळे दरम्यान २२ किलोमीटर पसरलेल्या खाडीकिनाऱ्यावरील खारफुटी व जैवविविधता धोक्यात आली आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. 

लोटस तलावाचे अस्तित्व धोक्यात
    महानगरपालिका मुख्यालयाजवळील लोटस तलावामध्ये अनेक वर्षांपासून डेब्रीजचा भराव टाकला जातो. 
    पर्यावरणप्रेमींनी या विरोधात न्यायालयील लढा लढला व जिंकलाही. न्यायालयाने डेब्रीज काढण्याचे आदेशही दिले, पण प्रत्यक्षात डेब्रीज हटविले नसून, आता तलावाचे अस्तित्वच नाकारले जात आहे. 

कांदळवन वनविभागाकडे हस्तांतर नाही
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये १४७५ हेक्टर क्षेत्रावर कांदळवन आहे. २७४ हेक्टर कांदळवन अद्याप वनविभागाकडे हस्तांतर झालेले नाही. 
करावेप्रमाणे शहरातील इतर ठिकाणीही कांदळवनाची कत्तल केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  पर्यावरणप्रेमी नागरिकांनी खारफुटीची कत्तल करणाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी केल्या आहेत. 
प्रशासनाने गुन्हाही दाखल केला आहे; पण प्रत्यक्षात कोणावरच कारवाई केलेली नाही. अनेक ठिकाणी अनधिकृत झोपड्या, डेब्रीजचा भराव टाकला जात आहे; पण त्यावरही कारवाई होत नसल्यामुळे  जंगल नष्ट होण्याची भीती आहे. 

वाशीमध्ये अतिक्रमण
वनविभागाच्या जागेमध्ये वाशीमध्ये अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम झाले आहे. दोन ठिकाणी वनविभागाने अतिक्रमणावर कारवाई केली होती; पण कारवाई झाल्यानंतर काही दिवसांमध्ये पुन्हा अतिक्रमण केले जात आहे. 

लोटस तलावाच्या रक्षणासाठी अनेक वर्षे लढा दिला आहे. खारफुटी व पाणथळ क्षेत्र वाचविण्यासाठी शासनाने व प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. 
- धर्मेश बरई, संस्थापक, एन्व्हायर्न्मेंट लाईफ फाउंडेशन

करावे खाडीकिनारी खारफुटीची कत्तल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला, पण प्रत्यक्षात कोणावरच कारवाई झालेली नाही. पर्यावरण रक्षणासाठीच्या तक्रारींकडेही गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. 
- सुनील आग्रवाल, पर्यावरणप्रेमी

Web Title: Biodiversity including mangroves along the bay is under threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.