जैवविविधता केंद्र पर्यटकांचे आकर्षण
By Admin | Updated: May 25, 2017 00:33 IST2017-05-25T00:33:08+5:302017-05-25T00:33:08+5:30
वनविभागाने ऐरोलीमध्ये सुरू केलेले किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र पर्यटकांचे आकर्षण ठरू लागले आहे.

जैवविविधता केंद्र पर्यटकांचे आकर्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वनविभागाने ऐरोलीमध्ये सुरू केलेले किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र पर्यटकांचे आकर्षण ठरू लागले आहे. खाडी किनाऱ्यांचे महत्त्व, जैवविविधतेची माहिती व किनाऱ्यांचे संरक्षण कसे करावे याविषयी माहितीचा खजाना या केंद्रामध्ये असल्याने उन्हाळ्याच्या सुटीमध्ये विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी पर्वणीच ठरली आहे.
ठाणे ही आशिया खंडातील सर्वात मोठी खाडी आहे. २६ किलोमीटरच्या खाडी परिसरामध्ये २०० पेक्षा जास्त पक्षी, सागरी जैवविविधता, खारफुटीचे घनदाट जंगल आहे. फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षीही खाडी किनाऱ्यावर प्रत्येक वर्षी आश्रयाला येतात. या जैवविविधतेची माहिती नागरिकांना व्हावी व खाडीचे पर्यटनस्थळामध्ये रूपांतर व्हावे यासाठी वनविभागाने ऐरोलीमध्ये दिवाळे जेट्टीच्या परिसरामध्ये किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात खाडी परिसरामध्ये असलेल्या खारफुटीचे जंगल, त्यांच्या विविध जातीची माहिती दिली आहे. मासे, खेकडे, गोगलगायी, फ्लेमिंगो या पक्ष्यांची माहिती देण्यात आली आहे. खारफुटीचे व जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने काय करावे याविषयी माहिती देण्यात आली आहे. बेडूक, मासे व इतर पक्ष्यांचे आवाज येथे ऐकण्यास मिळत आहेत. खारफुटीमध्ये असलेले साप, पक्षी व इतर जीवजंतूहीही पहावयास मिळत आहेत.
निसर्ग परिचय केंद्रामध्ये सेल्फी पॉइंट विकसित केला आहे. यामध्ये फ्लेमिंगो, कासवांची प्रतिकृती ठेवली असून ते पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. केंद्राच्या बाहेर खारफुटी निरीक्षणासाठी बांबूचा वापर करून मार्ग बनविण्यात आला आहे. परंतु हा मार्ग धोकादायक असल्याने सद्यस्थितीमध्ये तो बंद करण्यात आला आहे.
या ठिकाणी फायबरचा मार्ग बनविण्यात येणार आहे. खारफुटी, खेकड्यांचे तळे, निसर्गभ्रमण पायवाट, खाडी निरीक्षणाची सोय करण्यात आली आहे. खारफुटीचे निरीक्षण करण्याचा आनंदही घेता येत आहे. नवी मुंबईमध्ये वंडर्स पार्क हे एकमेव विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाणी आहे. या व्यतिरिक्त उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी जावे असे एकही ठिकाण नव्हते. वनविभागाने तयार केलेल्या या केंद्रामुळे नागरिकांसाठी हक्काचे निसर्ग पर्यटनस्थळ उपलब्ध झाले असून उन्हाळ्याची सुटी असल्याने शेकडो नागरिक या केंद्राला भेट देत आहेत.
प्रदुषण रोखण्याचे आवाहन
निसर्ग परिचय केंद्रामध्ये खाडी किनाऱ्यामध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी, खारफुटीची कत्तल, प्लास्टीक व इतर रसायनमिश्रीत पाण्यामुळे होणारे प्रदुषण याविषयी माहितीपट दाखविण्यात येत आहे. खाडीचे रक्षण करणे का आवश्यक आहे. खारफुटी संरक्षण भिंतीचे काम कसे करत आहे याविषयी माहितीही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्पा पूर्ण करण्याची मागणी
निसर्ग परिचय केंद्राच्या पहिल्या टप्प्यात माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. जवळपास १५ एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जात असून त्याचा दुसरा टप्पा विशेष महत्त्वाचा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी नौकाविहाराची सुविधा असणार आहे. खाडीमध्ये जावून जलपर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. धोकादायक बांबूच्या पुलाच्या जागी खारफुटी निरीक्षणासाठी फायबरचा मार्ग झुलता पूल तयार केला जाणार आहे. केंद्राच्या बाजूच्या भूखंडावर उद्यान विकसित केले जाणार आहे.
जैवविविधता केंद्रामध्ये उपलब्ध माहिती
महाराष्ट्रातील सागरी किनाऱ्यांची लांबी व महत्त्व
खाडीमधील जैवविविधतेची तपशीलासह माहिती
आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी असलेल्या चिखल्या खेकड्याची माहिती
खाडी किनारी असलेले पक्षी व त्यांची माहिती
ठाणे खाडीमध्ये येणारे फ्लेमिंगो व इतर विदेशी पक्षांची माहिती
स्थलांतरित पक्षी, त्यांच्या स्थलांतराची कारणे व इतर माहिती
पक्ष्यांच्या विसाव्याच्या जागेची माहिती, पक्ष्यांसाठी उपलब्ध खाद्य
सेल्फी पाइंटमध्ये फ्लेमिंगो, कासवाची प्रतिकृती
द्रृकश्राव्य विभागामध्ये खाडीकिनाऱ्याची व पक्ष्यांचा माहिती पट