हायटेक शाळांवर कोट्यवधींची उधळपट्टी

By Admin | Updated: July 14, 2016 02:15 IST2016-07-14T02:15:14+5:302016-07-14T02:15:14+5:30

पालिकेच्या कोपरखैरणे व सीवूडमधील शाळा इमारतीच्या बांधकामाची मुदत संपल्यानंतरही अद्याप बांधकाम पूर्ण झालेले नाही. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही रखडलेल्या कामांविषयी नाराजी व्यक्त केली

Billions of billions of billions of hiveec schools | हायटेक शाळांवर कोट्यवधींची उधळपट्टी

हायटेक शाळांवर कोट्यवधींची उधळपट्टी

नामदेव मोरे ,  नवी मुंबई
पालिकेच्या कोपरखैरणे व सीवूडमधील शाळा इमारतीच्या बांधकामाची मुदत संपल्यानंतरही अद्याप बांधकाम पूर्ण झालेले नाही. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही रखडलेल्या कामांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. भविष्यात नागरिकांची गरज व व्यवहार्यता तपासूनच कामे केली जाणार असून, अनावश्यक प्रकल्प राबविले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तुकाराम मुंढे यांनी पालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कामकाजाला शिस्त लावण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांनी कररूपाने जमा केलेल्या पैशाचा योग्य वापर झाला पाहिजे. अनावश्यक व अव्यवहार्य प्रकल्प राबविले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वी झालेल्या अनावश्यक कामांवरही नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये कोपरखैरणे सेक्टर ११ व सीवूड सेक्टर ५० मधील शाळांचाही समावेश आहे. कोपरखैरणेमध्ये सात वर्षांपूर्वी तब्बल २५ कोटी रुपये खर्च करून हायटेक शाळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. ४३२८ चौरस मीटरवर पूर्णपणे काचेचे तावदान असणाऱ्या इमारतीचे संकल्पचित्र शहरवासीयांच्या चर्चेचा विषय ठरली होती. पालिकेची सर्वात भव्य शाळा म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात होते. परंतु प्रत्यक्षात काम वेळेवर झाले नाही. यामुळे खर्चाचा आकडा ३५ कोटींवर पोचला आहे. कामाची मुदत कधीच संपून गेली आहे. नागरिकांनीही याविषयी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
सीवूड सेक्टर ५० मधील शाळेची आहे. येथे ७ कोटी ३१ लाख रुपये खर्च करून हायटेक शाळा उभारण्याचे काम डिसेंबर २०१२ मध्ये सुरू केले होते. १८६३ चौरस मीटर भूखंडावर तीन मजली इमारत उभारली जाणार होती. परंतु विविध कारणांनी काम वेळेत पूर्ण झाले नाही व बांधकामाचा खर्चही वाढत गेला. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यास सुरुवात केल्यानंतर या दोन्ही कामांविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक या ठिकाणी शाळा बांधण्यासाठी नागरिकांची मागणी होती का, शाळा उभारण्यासाठी नागरिकांनी मागणी केली होती काय, शाळेच्या इमारतीवर एवढा खर्च करणे आवश्यक होते का, याविषयी विचारणा केली होती. नुकतीच सीवूडमधील इमारतीची पाहणी केली. येथे रखडलेल्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. भविष्यात विकासकामे करताना त्या कामाची गरज आहे का, याची शहानिशा केली जाणार आहे. लोकहित लक्षात घेऊन कामे केली जातील. अनावश्यक खर्च न करण्याचा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेचे शहरवासीयांनीही स्वागत केले आहे. दोन्ही शाळांना होता विरोध
कोपरखैरणेमधील हायटेक शाळेच्या प्रस्तावास तत्कालीन विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी तीव्र विरोध केला होता. एकाच शाळेवर एवढा खर्च करणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले होते. काँगे्रस व शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केला होता. सीवूडमध्ये शाळेचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी येथे शाळेची गरज नसताना खर्च केला जात असल्याच्या तक्रारी दिल्या होत्या. परंतु दोन्ही ठिकाणी तक्रारींच्या विरोधाची फारशी दखल घेतली नव्हती. जबाबदारी कोणाची?
कोपरखैरणे व सीवूडमधील शाळेच्या इमारतीवर जनतेच्या कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाली आहे. दोन्ही शाळांची उभारणी करणे आवश्यक होते का, कोपरखैरणेमध्ये एकाच शाळेवर एवढा खर्च करण्याची गरज काय, नागरिकांनी मागणी केली होती का, असे अनेक प्रश्न निर्माण होत असून, कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या शाळांची जबाबदारी कोणाची, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आयुक्त याविषयी जबाबदारी निश्चित करणार असल्याचेही बोलले जात आहे.

Web Title: Billions of billions of billions of hiveec schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.