कर्जतमध्ये नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:36 IST2021-02-26T23:36:03+5:302021-02-26T23:36:15+5:30
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून सकाळी ८ वाजता सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

कर्जतमध्ये नगरपरिषदेच्या वतीने सायकल रॅली
कर्जत : माझी वसुंधरा अभियानांतर्गत कर्जत नगर परिषदेच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘पर्यावरणाचे संरक्षण म्हणजेच आपले संरक्षण’ हा संदेश देत कर्जतमध्ये जनजागृती करण्यात आली.
नगर परिषद क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, जागरूक नागरिक, शाळा-महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांचा प्रतिसाद आणि सहभागाने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियानांतर्गत कर्जत नगर परिषदेच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळून सकाळी ८ वाजता सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नगरसेविका पुष्पा दगडे, प्राची डेरवणकर, मधुरा चंदन, सुवर्णा निलधे, भारती पालकर, ज्योती मेंगाळ, स्वामिनी मांजरे, संचिता पाटील, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, विवेक दांडेकर, संकेत भासे उपस्थित
होते.
सायकल रॅलीत ५५ सायकलस्वार सहभागी झाले होते, यामध्ये लहान मुले तर ६५ वर्षांचे अशोक नगरे ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता, या रॅलीत नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेवक बळवंत घुमरे हे सहभागी झाले होते. यावेळी सायकल चालवा आरोग्य मिळवा, पर्यावरणाचे संरक्षण म्हणजेच आपले संरक्षण या घोषणा देण्यात आल्या. एक्सप्लोर १३ सायकलचे संतोष दगडे यांनी रॅलीस आयोजनास सहकार्य केले.