प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन होणार
By Admin | Updated: October 5, 2015 00:47 IST2015-10-05T00:47:54+5:302015-10-05T00:47:54+5:30
पालिका मुख्यालयातील मर्यादित जागेमुळे प्रशासनाच्या दैनंदिन कारभारात अडचण निर्माण होत असल्याने वाढलेल्या कारभार कार्यक्षम करण्यासाठी प्रशासनाने मीरा रोडच्या हद्दीतील छत्रपती

प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन होणार
भार्इंदर : पालिका मुख्यालयातील मर्यादित जागेमुळे प्रशासनाच्या दैनंदिन कारभारात अडचण निर्माण होत असल्याने वाढलेल्या कारभार कार्यक्षम करण्यासाठी प्रशासनाने मीरा रोडच्या हद्दीतील छत्रपती शिवाजी मार्गालगत लवकरच नवीन प्रशासकीय भवन बांधण्याचे निश्चित केले असून त्याच्या भूमिपूजनाचा सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आॅक्टोबरमध्ये पार पडणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या नियोजित प्रशासकीय भवनाच्या निर्मितीचे वृत्त सर्वप्रथम लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. शहराचे भौगोलिक क्षेत्रफळ ७९.४ चौरस किलोमीटर इतके असून लोकसंख्या १२ लाखांहून अधिक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. यावरून लोकसंख्येची घनता लक्षात येत असून वाढत्या लोकवस्तीमुळे पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी पालिकेच्या दैनंदिन कारभारावर ताण पडत आहे. सध्या पालिकेच्या अखत्यारीत ६ प्रभाग समिती कार्यालयांसह मीरा रोड येथील विभागीय कार्यालय व मुख्यालय या वास्तू असल्या तरी त्यातील जागा अपुऱ्या पडू लागली आहे. वाढीव जागेसाठी मुख्यालयाचे विस्तारीकरण शासनाच्या पर्यावरणवादी धोरणात अडकले असून त्याला २००२ मध्ये लागू झालेल्या सीआरझेड आराखड्यात प्रशासनाचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या परवानगीनुसार मुख्यालयाचा विस्तार करता येत नसल्याची तांत्रिक अडचण प्रशासनाच्या माथी पडल्याने मुख्यालय विस्ताराखेरीज नवीन प्रशासकीय भवन निर्माण करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे.
ही नवीन वास्तू मीरा रोडच्या एस.के. स्टोन पोलीस चौकीमागील सर्व्हे क्र. ४७१, ४८१ व ४८४ मधील जागेवर निर्माण करण्यात येणार असून त्याचा आराखडा येत्या दोन दिवसांत प्रशासनाला सादर होण्याची शक्यता आहे. सध्या या जागेवर काही वादग्रस्त बांधकामे अस्तित्वात तर काही सुरू असून ती निष्कासित करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. (प्रतिनिधी)