नैना क्षेत्रात घरे घेताना सावधान...

By Admin | Updated: October 14, 2016 06:54 IST2016-10-14T06:54:39+5:302016-10-14T06:54:39+5:30

स्वस्त व बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून ओळख निर्माण झालेल्या सिडकोच्या नैना क्षेत्रात बोगस गृहप्रकल्पांचा सुळसुळाट

Beware of hiring houses in Naina area ... | नैना क्षेत्रात घरे घेताना सावधान...

नैना क्षेत्रात घरे घेताना सावधान...

कमलाकर कांबळे / नवी मुंबई
स्वस्त व बजेटमधील घरांचे डेस्टिनेशन म्हणून ओळख निर्माण झालेल्या सिडकोच्या नैना क्षेत्रात बोगस गृहप्रकल्पांचा सुळसुळाट झाला आहे. फसवणुकीच्या विविध प्रकरणात गुन्हे दाखल झालेले काही विकासक पुन्हा या क्षेत्रात सक्रिय झाले आहेत. बोगस गृहप्रकल्पांच्या नावाने ग्राहकांना लुटण्याचे सत्र सुरूच असल्याने ग्राहकांनी नैना क्षेत्रात घरे घेताना सावधानता बाळगण्याचे आवाहन सिडकोच्यावतीने केले आहे.
विमानतळ प्रभावित क्षेत्रात मोडणाऱ्या ठाणे, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण आणि उरण या तालुक्यातील २५ किलोमीटर क्षेत्रासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार सिडकोने या परिसराचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना तयार केली आहे.
पहिल्या टप्प्याचा विकास आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला पुढील आठवडाभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. असे असले तरी या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास तीन-साडेतीन वर्षांचा विलंब लागल्याने या क्षेत्रातील विकासकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेक प्रस्तावित प्रकल्प परवानगीअभावी रखडले आहेत. याचा नेमका फायदा भूमाफियांनी घेतला आहे. मोकळ्या जागा बळकावून विनापरवाना गृहप्रकल्प उभारले जात आहेत. त्याद्वारे शेकडो गरजूंची फसवणूक केली जात आहे.
गेल्या साडेतीन वर्षांत म्हणजेच २0१२ ते सप्टेंबर २0१६ या काळात २३ विकासकांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली आहे. विशेष म्हणजे गुन्हे दाखल झालेले बहुतांशी शहरातील नामांकित विकासक आहेत. त्यांच्यावर एकूण ४१ गुन्हे दाखल झाले असून याद्वारे ग्राहकांना तब्बल १00 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले यातील काही विकासक पुन्हा नैना क्षेत्रात सक्रिय झाले आहेत.
मोकळ्या जागा बळकावून त्यावर गृहप्रकल्प प्रस्तावित केले आहेत. अनेकांनी मोकळ्या भूखंडांना कुंपण घालून गृहप्रकल्प प्रस्तावित केले आहेत. त्याचे जोरदार बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. विशेषत: नैना क्षेत्रांतर्गत मोडणाऱ्या सुकापूर, नेरे, उम्रोली, विचुंबे, तळोजा आदी परिसरात हा प्रकार सुरू आहे. या विभागात शेकडो नवीन गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. तर अनेक प्रकल्प प्रस्तावित करून घरांचे बुकिंग सुरू केले आहे. सध्या चार ते पाच हजार रुपयांनी घरांचे बुकिंग घेतले जात आहे. शेजारच्या विकसित क्षेत्राच्या तुलनेत हे दर कमी आहेत.

Web Title: Beware of hiring houses in Naina area ...