विसर्जनासाठी चोख बंदोबस्त
By Admin | Updated: September 26, 2015 23:15 IST2015-09-26T23:15:46+5:302015-09-26T23:15:46+5:30
दहा दिवसांच्या लाडक्या बाप्पाला रविवारी निरोप देण्यात येणार असल्याने जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

विसर्जनासाठी चोख बंदोबस्त
अलिबाग : दहा दिवसांच्या लाडक्या बाप्पाला रविवारी निरोप देण्यात येणार असल्याने जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी एक हजार ५४१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
जिल्ह्यात १४३ सार्वजनिक आणि १७ हजार ४०१ घरगुती गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. अलिबागच्या समुद्रकिनारी लाइट, तसेच निर्माल्य गोळा करण्यासाठी अलिबाग नगर पालिकेकडून निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहे.
१६ जुलै ते १५ सप्टेंबर २०१५ या कालावधीत रायगड पोलिसांनी एक हजार ४७० सीआरपीसीप्रमाणे कारवाई केली आहे. मुंबई पोलीस अॅक्ट नुसार ४३, तर दारुबंदी कलमान्वये २८ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती रायगड पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस निरीक्षक अरविंद पाटील यांनी लोकमतला सांगितले.
-------
विसर्जन केंद्र नसतानाही मुंबईची गर्दी
नवी मुंबई : वाशी खाडीपुलाखाली होणारे विसर्जन धोक्याचे ठरत आहे. शुक्रवारी रात्री विसर्जनासाठी आलेली एक व्यक्ती वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी बंदी केल्यानंतरही मुंबईतून विसर्जनासाठी गणेशमूर्ती येत असल्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मानखुर्द परिसरातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी वाशी खाडीपुलाखाली येत असल्याने अनंत चतुर्दशीच्या दिवशी पोलिसांची डोकेदुखी वाढणार आहे. खाडीपुलाच्या मानखुर्द हद्दीच्या भागात परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र वाशीकडील खाडीच्या भागात पुरेशी सोय नसल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी विसर्जनावर बंदी आणलेली आहे. केवळ मच्छीमार बांधवांचा हा नेहमीचा मार्ग असल्याने त्यांच्याच घरगुती गणेशमूर्तींचे त्याठिकाणी होडीतून विसर्जन होते. मात्र इतर व्यक्तींसाठी धोका असल्याने या ठिकाणी त्यांना प्रवेश दिला जात नाही.
तशा सूचनाही वाशी पोलिसांनी दिलेल्या आहेत. असे असतानाही मानखुर्द परिसरातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी त्या ठिकाणी आणल्या जात आहेत. पाचव्या दिवशीच्या विसर्जनावेळी सुमारे २०० गणेशमूर्तींचे त्याठिकाणी विसर्जन झाले. वाशी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करुनही अनेकजण खाडीमध्ये प्रवेश करत होते. शुक्रवारी रात्रीदेखील मानखुर्दच्या काही गणेशमूर्ती वाशी खाडीपुलाखाली विसर्जनासाठी आल्या होत्या. या वेळी राजू रामभरोसे (४२) यांचा तोल जाऊन पाण्यात पडले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेऊनही त्यांचा तपास लागलेला नाही.
मानखुर्द येथे बंदोबस्तावर असलेल्या मुंबई पोलिसांकडून त्या ठिकाणी आलेल्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी वाशी हद्दीत पाठवल्या जात आहेत. त्यामुळे रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशीदेखील वाशी खाडीपुलाखाली विसर्जनासाठी मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे आगमन होण्याची शक्यता आहे.
सदर ठिकाणी दलदलीचा भाग असल्याने गाळात रुतून अथवा पाण्याच्या प्रवाहात व्यक्ती वाहून जाण्याची शक्यता आहे. यामुळे नवी मुंबई पोलिसांनी चेंबूर पोलिसांशी संपर्क साधून मानखुर्दच्या गणेशमूर्ती वाशीत पाठवू नये अशा सूचनाही केलेल्या आहेत. (प्रतिनिधी) (प्रतिनिधी)