होळीनिमित्ताने शहरात चोख पोलीस बंदोबस्त
By Admin | Updated: March 12, 2017 02:49 IST2017-03-12T02:49:40+5:302017-03-12T02:49:40+5:30
होळी व धूलीवंदननिमित्ताने शहरात दोन दिवस चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची खबरदारी

होळीनिमित्ताने शहरात चोख पोलीस बंदोबस्त
नवी मुंबई : होळी व धूलीवंदननिमित्ताने शहरात दोन दिवस चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर सण साजरा करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याचेही आवाहन पोलिसांतर्फे जनतेला करण्यात आले आहे.
होळीनिमित्ताने शहरात ठिकठिकाणी जय्यत तयारी सुरू असतानाच पोलिसांनीही सतर्कता बाळगली आहे. होळीच्या सणाला कोणतेही गालबोट लागू नये, याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आली आहे. त्याकरिता शहरातील महत्त्वाची ठिकाणे व चौकांमध्ये चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. यादरम्यान संशयित वाहनांची झडाझडती घेतली जाणार असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्याशिवाय मोठ्याने घोषणा देणे, वाद्य वाजविणे, असभ्य कृत्य करणे, महिला अथवा मुलींची छेड काढणारे, वाहनांवर अथवा पादचाऱ्यांवर फुगे फेकणारे, यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले आहे. तर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांनाही पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)