बोगस लाभार्थ्यांनाही अन्न सुरक्षेचा लाभ

By Admin | Updated: February 29, 2016 02:01 IST2016-02-29T02:01:07+5:302016-02-29T02:01:07+5:30

पेण तालुक्यातील हमरापूरमधील रास्त धान्य दुकानातील रेशनकार्डधारक दारिद्र्यरेषेवरील अन्नसुरक्षा योजनेचा बेकायदा लाभ घेत आहेत.

Benefits of food security for bogus beneficiaries | बोगस लाभार्थ्यांनाही अन्न सुरक्षेचा लाभ

बोगस लाभार्थ्यांनाही अन्न सुरक्षेचा लाभ

जयंत धुळप,  अलिबाग
पेण तालुक्यातील हमरापूरमधील रास्त धान्य दुकानातील रेशनकार्डधारक दारिद्र्यरेषेवरील अन्नसुरक्षा योजनेचा बेकायदा लाभ घेत आहेत. याप्रकरणी सुधीर सखाराम जाधव यांनी तक्रार दाखल केल्यावर त्यांची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत चौकशी करून कार्यवाहीचे आदेश रायगडचे जिल्हा पुरवठा अधिकारी लीलाधर धुपारे यांनी पेण तहसीलदारांना दिले आहेत.
वादातीत रेशनकार्डधारकांचे कुटुंबनिहाय पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तलाठी आणि मंडल अधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पेणच्या तहसीलदार वंदना मकू यांनी दिली आहे.
पळी-पोयनाड येथे राहणारे सुधीर सखाराम जाधव यांचे हमरापूर हे आजोळ आहे. आपल्या आईच्या हक्कासंदर्भात २९ सप्टेंबर २0१५ रोजी माहितीच्या अधिकारात अन्नसुरक्षा योजनेंतर्गत हमरापूर येथील रेशन दुकानातील शिधापत्रिकाधारकांची यादी त्यांनी मागितली होती. ही यादी बनविताना कोणतेही निकष पाळले गेले नाहीत तसेच प्राधान्य गटातील यादीत सरकारी नोकरीत रुजू असलेले बरेचसे लाभधारक आहेत, ज्यांच्याकडे चारचाकी, दुचाकी वाहने अशांची नावेही दारिद्र्यरेषेखालील यादीत समाविष्ट आहेत.
या लाभधारकांचे मोठे बंगले आहेत. काहींचे गणपतीचे कारखाने आहेत. अशा बेकायदा लाभधारकांची यादीच सुधीर सखाराम जाधव यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना
केलेल्या तक्रार अर्जासोबत जोडली आहे.

Web Title: Benefits of food security for bogus beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.