जिल्हा नियोजनाच्या कामांबाबत सतर्क राहा
By Admin | Updated: May 31, 2016 03:13 IST2016-05-31T03:13:38+5:302016-05-31T03:13:38+5:30
जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत असलेल्या विकासकामांबाबत सर्व लोकप्रतिनिधी, सदस्य आणि प्रशासनाने अत्यंत सतर्कतेने काम करून विकासकामांना गती द्यावी

जिल्हा नियोजनाच्या कामांबाबत सतर्क राहा
अलिबाग : जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत असलेल्या विकासकामांबाबत सर्व लोकप्रतिनिधी, सदस्य आणि प्रशासनाने अत्यंत सतर्कतेने काम करून विकासकामांना गती द्यावी, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी सोमवारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात महेता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा नियोजन समितीच्या मागील बैठकीतील विविध प्रश्नांच्या पूर्ततेबाबत आढावा घेतला. त् यावेळी वन विभाग,विद्युत वितरण कंपनी,खनिकर्म विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, भुसंपादन विभाग, आरोग्य विभाग, खारलॅन्ड विभाग, राष्ट्रीय महामार्ग, पाणीपुरवठा आदी विभागांतील विविध कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. काही प्रश्न केंद्र शासनाच्या अधिनस्त असल्याने त्यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे निदेश पालकमंत्र्यांनी दिले.
विकासकामांना निधी उपलब्ध होत असतानाही अधिकारी हात आखडता घेत असल्याने कामांना अडथळे येत आहेत. अधिकारी कोणत्याही प्रकारची योजनांची माहिती लोकप्रतिनिधींना देऊन प्रबोधन करीत नसल्याने जनतेपर्यंत त्या योजना पोहचत नाही अशी तक्र ार आ. जयंत पाटील यांनी केली. इतर आमदारांनीही चांगलेच आक्र मक होऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. या बैठकीला रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, आ. भरत गोगावले आदी मान्यवर उपस्थित होते.