गडचिरोलीमधील आदिवासींना पोलिसांचा मायेचा आधार
By Admin | Updated: October 29, 2015 23:48 IST2015-10-29T23:48:30+5:302015-10-29T23:48:30+5:30
गडचिरोलीमधील आदिवासी नागरिकांसाठी नवी मुंबई पोलिसांनी तीन ट्रक साहित्य संकलित केले आहे. यामध्ये कपडे, भांड्यांसह खेळाच्या साहित्याचाही समावेश आहे.

गडचिरोलीमधील आदिवासींना पोलिसांचा मायेचा आधार
नवी मुंबई : गडचिरोलीमधील आदिवासी नागरिकांसाठी नवी मुंबई पोलिसांनी तीन ट्रक साहित्य संकलित केले आहे. यामध्ये कपडे, भांड्यांसह खेळाच्या साहित्याचाही समावेश आहे. यामुळे तीन हजारपेक्षा जास्त कुटुंबीयांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.
नवी मुंबई पोलिसांनी नवरात्री उत्सवाच्या दरम्यान गडचिरोलीमधील आदिवासींना मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. मुंबई, नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये सण, उत्सव आनंदामध्ये साजरे होतात. उत्सवांवर करोडो रुपये खर्च केले जातात. पण येथून साडेसातशे किलोमीटर दूर असणाऱ्या गडचिरोलीमधील आदिवासी बांधवांना मात्र प्राथमिक सुविधा मिळत नाहीत. कपडे, भांडी व इतर अत्यावश्यक साहित्य घेतानाही तारेवरची कसरत करावी लागते. त्यांच्याही जीवनात आनंद फुलवू या असे आवाहन पोलीस आयुक्त प्रभात रंजन, परिमंडळ एकचे उपआयुक्त विश्वास पांढरे व शहाजी उमाप यांनी केले होते. या आवाहनाला नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामधील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ९७ संघटना व राजकीय, सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून जुने, नवे कपडे व भांडी संकलित केली. तब्बल तीन ट्रक साहित्य जमा झाले आहे.
नवी मुंबई, पनवेलकरांनी तब्बल २४१ गोणी व बॉक्स भरून जुने कपडे दिली आहेत. मोठ्याप्रमाणात नवीन कपडेही भेट दिले आहेत. यामध्ये शर्ट, ट्रॅक पँट, टी शर्ट, साडी, पँटचे एकूण ५८०० नगांचा समावेश आहे. दिवाळीनंतर थंडी सुरू होणार. थंडीपासून बचाव व्हावा यासाठी ६०० ब्लँकेटही दिले आहेत. आदिवासींच्या घरामध्ये पुरेशी भांडीही नसतात यामुळे ताट, वाटी, ग्लास, प्लेट, पातेले यांचे ५१३० नगही दिले आहेत. नागरिकांकडून जमा केलेले साहित्य तीन ट्रकमध्ये भरून गुरुवारी सायंकाळी गडचिरोलीला पाठविण्यात आले. पोलीस मुख्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमास आयुक्त प्रभात रंजन, अतिरिक्त आयुक्त विजय चव्हाण, या मदतीसाठी परिश्रम करणारे परिमंडळ दोनचे उपआयुक्त विश्वास पांढरे, उपआयुक्त सुरेश मेंगडे, प्रशांत खैरे, अरविंद साळवी व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)