एक क्लिकवर मिळणार प्रत्येक वृक्षाची इत्थंभूत माहिती; अत्याधुनीक पद्धतीने वृक्षगणना
By नामदेव मोरे | Updated: August 29, 2023 19:30 IST2023-08-29T19:30:04+5:302023-08-29T19:30:16+5:30
शहरातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.

एक क्लिकवर मिळणार प्रत्येक वृक्षाची इत्थंभूत माहिती; अत्याधुनीक पद्धतीने वृक्षगणना
नवी मुंबई : शहरातील वृक्षांची गणना करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. वृक्षगणनेसाठी अत्याधुनीक तंत्राचा वापर केला जाणार आहे. यासाठी स्वॉप्टवेअरही तयार केले जाणार आहे. जीपीएस व जीआयएस तंत्राचाही वापर केला जाणार आहे. एक क्लिकवर प्रत्येक वृक्षाचा तपशील मिळविणे आता शक्य होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वृक्ष लागवड व संवर्धनावर विशेष लक्ष दिले आहे. कोपरखैरणे व नेरूळमध्ये मियावाकी पद्धतीने जंगल तयार केले आहे. स्मृतीउद्यानासह प्रत्येक विभागामध्ये उद्याने विकसीत केली आहेत. हिरवळ विकसीत केली आहे. पामबीच रोड, ठाणे बेलापूर रोड, सायन - पनवेल महामार्ग, मोकळे भूखंड, खाडीकिनारी व डोंगराला लागून मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. सीबीडीच्या डोंगरावरही घनदाट जंगल आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये २०१६ मध्ये वृक्षगणना करण्यात आली होती. तेव्हा ९ लाख ४७ हजार वृक्षांची नोंद झाली होती. यानंतर मनपा प्रशासनाने, खासगी संस्थांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. या सर्व वृक्षांची गणना लवकरच सुरू केली जाणार आहे.
वृक्षगणनेसाठी महानगरपालिका प्रशासन मोबाईल ॲप्लीकेशन तयार करणार आहे. प्रत्येक वृक्षाची उंची, रूंदी, त्याचे नाव, हेरीटेज वृक्षांची माहिती, ठिकाण व सर्व नोंदी ठेवल्या जाणार आहेत. प्रत्येक वृक्षाचे फोटो व त्याचे जीपीएस लोकेशन यांचीही नोंद ठेवली जाणार आहे. महानगरपालिका प्रशासनास एका क्लिकवर त्या वृक्षाचे ठिकाण, उंची, आकार, नाव व इतर सर्व माहिती सहज उपलब्ध होणार आहे. या मोबाईल ॲप्लीकेशन तयार करण्यासाठी जवळपास २ कोटी रूपये खर्च होणार आहेत. लवकरच वृक्षगणनेसाठीची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. सदर मोबाईल ॲप्लीकेशनचा वापर वृक्षछाटणी व इतर कामांसाठीही होणार असून पुढील पाच वर्ष त्याची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधीत कंपनीची असणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील वृक्षगणना करताना अत्याधुनीक तंत्राचा वापर केला जाणार आहे. वृक्षाचे फोटो, त्याचे ठिकाण, नाव सर्व माहिती या सर्वांची नोंद ठेवली जाणार आहे.
दिलीप नेरकर, उपायुक्त उद्यान
वृक्षगणनेमध्ये पुढील नोंदी केल्या जाणार
- शहरातील सर्व वृक्षांची संख्या समजणार
- वृक्षांचे नाव, त्यांची उंची, आकार यांचा तपशील मिळणार.
- वृक्षांचे ठिकाण, त्यांचे जीपीएस लोकेशन निश्चीत केले जाणार.
- शहरातील हेरीटेज वृक्षांची स्वतंत्र नोंद केली जाणार.
- शहरातील किती वृक्षवाढ झाली याचा तपशीलही उपलब्ध होणार.
- कोणत्या विभागात किती वृक्ष आहेत याचा तपशीलही प्राप्त होणार.