पाझर तलावांनी गाठला तळ

By Admin | Updated: May 15, 2016 04:03 IST2016-05-15T04:03:19+5:302016-05-15T04:03:19+5:30

जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका म्हणून कर्जतची ओळख आहे. मात्र पावसाचे पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसते. सद्य:स्थितीत तालुक्यातील सहा पाझर तलावांनी तळ गाठले आहेत

The base reached by percolation tanks | पाझर तलावांनी गाठला तळ

पाझर तलावांनी गाठला तळ

विजय मांडे, कर्जत
जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका म्हणून कर्जतची ओळख आहे. मात्र पावसाचे पाणी वाहून जात असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ बसते. सद्य:स्थितीत तालुक्यातील सहा पाझर तलावांनी तळ गाठले आहेत. तसेच तीन लघु पाटबंधारे प्रकल्प असलेली धरणेदेखील आटली आहेत. दोन मध्यम प्रकल्प असलेल्या धरणांमधील पाण्याची पातळी खालावल्याने कर्जतमधील जनतेच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
कर्जत तालुक्यात खांडस, आर्ढे, वरई-अवसरे, कशेळे, जांबरु ख, अंभेरपाडा या ठिकाणी डोंगराचे पाणी अडवून पाझर तलावांची निर्मिती रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १९८० च्या दशकात करण्यात आली. त्याच कालावधीत खांडपे, डोंगरपाडा आणि बलीवरे येथे जिल्हा परिषदेने लघु पाटबंधारे प्रकल्पांची उभारणी सुरू केली. हे सर्व पाझर तलाव आणि लघु पाटबंधारे प्रकल्प यांचे पाणी शेतीसाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते.
राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने पाली-भूतीवली आणि पाषाणे या ठिकाणी उच्चस्तर लघु पाटबंधारे प्रकल्प उभारून पावसाचे पाणी अडविण्याचा प्रयत्न केला आहे . मात्र गतवर्षीच्या कमी पावसाने तालुक्यातील पाणीसाठा करणारी सर्व धरणे सध्या कोरडी पडू लागली आहेत. त्यामुळे पाझर तलाव आणि लघु पाटबंधारे प्रकल्पातून नाल्यामध्ये किंवा नदीमध्ये सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. धरणातील पाणी पूर्णपणे आटून गेले, तर धरणाच्या जलाशयातील पाण्यामध्ये असलेल्या सजीवांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील पाझर तलाव आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.
जलाशय कोरडे पडल्याने तालुक्यातील अनेक ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना कोलमडून पडल्या आहेत. उद्भव विहिरी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी नदी किंवा नाल्यात वाहणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या वाढली आहे. पाली - भूतीवली या लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयात खासगी बिल्डर एकाच वेळी अनेक मोटर लावून पाणी उचलतात. मात्र ज्यांनी धरणासाठी, पाझर तलाव बांधण्यासाठी जमिनी दिल्या, त्यांच्या नळपाणी योजना धरणापासून दूर उभारण्यात आल्या आहेत. तालुक्यातील २०० हून अधिक आदिवासीवाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे.
झाडे आणि वनराईने नटलेल्या तालुक्यातील पावसाचे पाणी अडविण्याची मोहीम राज्य सरकार आणि रायगड जिल्हा परिषदेने १९८० च्या दशकात घेतली होती. कर्जत तालुक्याच्या सर्व भागांत पाझर तलाव आणि लघु पाटबंधारे प्रकल्प यांच्या माध्यमातून पाणी अडविण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. त्यातील सर्व प्रकल्प हे जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आले होते. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाझर तलाव आहेत, पण तरीही तालुक्यात तीव्र पाणीटंचाईस जनतेला सामोरे जावे लागत आहे. आता थेट धरणामधून पाणी उचलण्याची व्यवस्था करण्यासाठी नवीन नळपाणी योजनांचा विचार झाला पाहिजे.
- उदय पाटील, शेतकरी

Web Title: The base reached by percolation tanks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.