पायाभूत चाचणीचा पाया कच्चा
By Admin | Updated: October 5, 2015 00:54 IST2015-10-05T00:54:00+5:302015-10-05T00:54:00+5:30
राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचा एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, या हेतूने शालेय शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम यंदापासून सुरू केला आहे

पायाभूत चाचणीचा पाया कच्चा
प्रशांत शेडगे, पनवेल
राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचा एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, या हेतूने शालेय शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम यंदापासून सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये त्याची पहिली चाचणी सुरू आहे. पनवेल तालुक्यात अनेक शाळांना पुरेशा प्रश्नपत्रिका मिळाल्या नाहीत. शाळांना उपक्र म राबवताना खिशातून खर्च करावा लागत आहे. एकंदरीत या उपक्रमाचा पहिल्याच चाचणीत बोजवारा उडाला असून, कोट्यवधी रुपये खर्च करून पायाभूत चाचणीत शिक्षण विभाग सर्व पातळींवर नापास झाला आहे.
शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी गुणवत्ता वाढीसाठी वाचन,लेखन, संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रि या या क्षमतांची संपादणूक प्रभुत्व पातळी वाढवण्याच्या दृष्टीने शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांनी वयोगटानुसार अपेक्षित क्षमता प्राप्त करणे, शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, संपादणूक पातळी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी एक पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापनाच्या दोन, अशा तीन परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, या परीक्षांमधून शिक्षण विभागाला जे साध्य करायचे आहेते साध्य होताना दिसत नाही.
पायाभूत चाचणीचा निकाल हा ग्रेडनुसार जाहीर होणार आहे. त्यातून कोणत्या शाळेत किती प्रगत आणि अप्रगत विद्यार्थी आहेत, हे समोर येणार आहे. अप्रगत विद्यार्थी अधिक राहिल्यास त्या शिक्षकांवर कारवाईसुद्धा केली जाणार आहे. मात्र, हा कार्यक्र म राबवताना परीक्षा घेण्याचे अधिकार शाळांनाच देण्यात आले आहेत. मोजक्याच शाळांमध्ये तिसरी परीक्षा ही त्रयस्थ यंत्रणेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून पनवेल तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकासुद्धा पाठवण्यात आल्या नाहीत. तोंडी व लेखी स्वरूपात ही परीक्षा घेण्यात येत असून त्याकरिता स्वतंत्र प्रश्नपत्रिका आहेत.
मराठी व गणित या दोन विषयाची परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र प्रश्न पत्रिकाच नसल्याने विद्यार्थ्यांना पेपर कसे द्यायचे, असा प्रश्न मुख्याध्यापकांसह शिक्षकांना पडला आहे. पनवेल परिसरातील अनेक जिल्हा परिषद, खाजगी शाळांमध्ये पुरेशा प्रश्नपत्रिका मिळालेल्या नाहीत त्यामुळे शाळा, शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुका शिक्षण कार्यालयात सुध्दा प्रश्नपत्रिका शिल्लक नसल्याने शिक्षकवर्ग चिंतेत आहे. शिक्षकांना काही समजेना काही उमजेना
एक तर प्रश्नपत्रिका मिळाल्या नाहीत त्याचबरोबर ही चाचणी घ्यायची कशी याकरिता जे माहितीपत्रक आहे तेही कित्येक शाळेतील शिक्षकांना मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांना काही समजेना काही उमजेना एखाद्याला माहिती पत्रक मिळाले की त्याची झेरॉक्स काढून काही ठिकाणी काम चलावू धोरण अवलंबिण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची सामूहिक गुणपत्रिका अतिशय छोटी असून त्याचे कॉलमही लहान आहे त्यामुळे त्यात माहिती भरताना अनेक अडचणी येत आहेतच.
रॅण्डम चाचण्या निवडक शाळांतच
त्रयस्थ संस्थेच्या सहभागाने प्रथम सत्राअखेर एक, दुसऱ्या सत्राअखेर एक अशा दोन रॅण्डम चाचण्या निवडक शाळांत होतील. सर्व चाचण्यांचे आराखडे, आयोजन, अंमलबजावणी पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद करत आहे. चाचणीत बालकांची समज क्षमता तपासतील. लेखी, तोंडी प्रात्यक्षिक यांचा पायाभूत चाचण्यांमध्ये समावेश आहे.
पायाभूत चाचणी पनवेल तालुक्यातील सगळ्या शाळांमध्ये घेण्याचे काम सुरू आहे. याकरिता मुख्याध्यापक व शिक्षकांना यापूर्वी प्रशिक्षण सुध्दा देण्यात आले आहे. काही शाळांना प्रश्नपत्रिका कमी पडल्या ही बाब सत्य आहे. त्यानुसार अलिबाग कार्यालयातून प्रश्नपत्रिका मागविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्या त्या शाळा व शिक्षकांना मुदत वाढून देण्यात आली आहे.
- नवनाथ साबळे,
गटशिक्षण अधिकारी, पनवेल