लाखोंचा गंडा घालणारा भामटा गजाआड
By Admin | Updated: October 27, 2015 00:31 IST2015-10-27T00:31:24+5:302015-10-27T00:31:24+5:30
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पनवेल येथील शाखेमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून बँकेकडून तब्बल ३६ लाख रुपयांचे गृहकर्ज मिळविणाऱ्या भामट्याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे

लाखोंचा गंडा घालणारा भामटा गजाआड
पनवेल : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पनवेल येथील शाखेमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून बँकेकडून तब्बल ३६ लाख रुपयांचे गृहकर्ज मिळविणाऱ्या भामट्याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. कुवर रामचंद्र सिंग (३६) असे या भामट्याचे नाव असून त्याने पराग सारंग दामुदरे या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून बँकेची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी कुवर रामचंद्र सिंग हा कामोठे सेक्टर-२० मध्ये राहावयास असून त्याने गत जुलै महिन्यामध्ये पराग सारंग दामदुरे या नावाने बनावट कागदपत्रे तयार केली होती. त्यानंतर त्याने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पनवेल शाखेमध्ये सदर बनावट कागदपत्रे सादर करून गृहकर्जासाठी अर्ज केला होता. याचदरम्यान त्याने याच बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने एका फायनान्स कंपनीकडे देखील गृहकर्जासाठी अर्ज केला होता. दरम्यान, स्टेट बँक आॅफ इंडियाने या बनावट कागदपत्रांच्या आधारावर कुवर सिंग याला तब्बल ३६ लाख रुपयांचे गृहकर्ज मंजूर करून त्याला चेक देवून टाकला.
दरम्यान, आरोपी कुवर सिंग याने ज्या फायनान्स कंपनीकडे गृहकर्जासाठी अर्ज केला होता त्या एजन्सीला कुवर सिंग याने सादर केलेल्या कागदपत्रांवर संशय आल्याने त्यांनी कुंवर सिंगचा शोध सुरू केला होता. तसेच त्याने सदर कागदपत्रांचा वापर करून इतर बँकांकडून कर्ज घेतले असण्याची शक्यता असल्याने या फायनान्स कंपनीने विविध बँकांकडे या व्यक्तीबाबत चौकशी सुरू केली
होती.
चौकशीदरम्यान पनवेलच्या स्टेट बँकेकडून कुवर सिंग याने ३६ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतल्याचे आढळून आल्यानंतर सदर फायनान्स कंपनीने स्टेट बँकेला कुवर सिंग याच्या बनावट कागदपत्रांची माहिती दिली. त्यामुळे बँकेने कुवर सिंग याच्या कृत्याची माहिती पोलिसांना देवून त्याला बँकेत बोलावून घेवून त्यानुसार तो बँकेत आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने केलेला फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. (प्रतिनिधी)