बाळासाहेबांचे स्मारक सहा महिन्यांत ?
By Admin | Updated: December 22, 2015 00:30 IST2015-12-22T00:30:19+5:302015-12-22T00:30:19+5:30
तीनहातनाका येथील इटर्निटी मॉलशेजारी असलेल्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला महासभेने मंजुरी दिली

बाळासाहेबांचे स्मारक सहा महिन्यांत ?
ठाणे : तीनहातनाका येथील इटर्निटी मॉलशेजारी असलेल्या महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला महासभेने मंजुरी दिली असून येत्या सहा महिन्यांत त्याचे काम पूर्ण होईल, असा पालिकेचा दावा आहे. सध्या त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. या स्मारकाच्या ठिकाणी अॅम्पी थिएटर, प्रदर्शन हॉल आदींसह विविध वास्तू या एकाच छताखाली जुन्यासह नव्या कलाकारांसाठी उपलब्ध होणार आहेत.
या कामासाठी ११ कोटी १२ लाख ४६ हजार ५२९ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. तीनहातनाका भागात हे स्मारक व्हावे, यासाठी स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के यांच्यासह सर्वपक्षीयांचा पुढाकार लाभल्याने ते आता खऱ्या अर्थाने मार्गी लागत असल्याची भावना म्हस्के यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. एका वर्षाच्या आत हे स्मारक उभे राहणार आहे. प्रभाग क्र. ३७ मध्ये ते उभारले जाणार असून पिरॅमिड आकाराची इमारत येथे उभारली जाणार आहे. तळ अधिक दोन मजल्यांची ही अॅनेक्स इमारत असणार आहे. इमारतीच्या आवारातच बाळासाहेबांचे ४२ फुटी स्मारक उभारले जाणार असून ३० हजार चौरस फुटांवर ही दुमजली पिरॅमिड वास्तू उभारली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात विद्युत, रंगरंगोटी आणि इतर पायाभूत सुविधांची कामे केली जाणार आहेत. त्यानुसार, या कामाला शनिवारी झालेल्या महासभेत मंजुरी मिळाली असून हे काम आता लवकरच सुरू होणार आहे. पुढील पाच ते सहा महिन्यांत हे काम पूर्ण होऊन ठाण्यासह मुंबई व जिल्ह्यातील नव्याजुन्या कलावंतांसाठी या स्मारकाच्या माध्यमातून एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.