ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर काळाच्या पडद्याआड; अध्यात्माचा विश्वकोश हरपला 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 06:08 AM2023-10-27T06:08:54+5:302023-10-27T06:10:00+5:30

शासकीय इतमामात आज नवी मुंबईत अंत्यसंस्कार

baba maharaj satarkar passes away the encyclopedia of spirituality is lost | ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर काळाच्या पडद्याआड; अध्यात्माचा विश्वकोश हरपला 

ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर काळाच्या पडद्याआड; अध्यात्माचा विश्वकोश हरपला 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार व अध्यात्माचा चालता बोलता विश्वकोश, समाजप्रबोधनकार हभप  बाबा महाराज सातारकर यांचे गुरुवारी सकाळी ६ वाजता नेरूळ, नवी मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. 

त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या अध्यात्म परंपरेचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता नवी मुंबईच्या सारसोळे येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुली हभप भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर, नातू चिन्मय महाराज, परतवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव नेरूळ रेल्वे स्टेशनजवळील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवले आहे.

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारा येथे झाला. त्यांच्या घरामध्ये १३५ वर्षांपासून अध्यात्माचा वारसा सुरू आहे. वयाच्या आठव्या वर्षांपासून त्यांनी कीर्तनात चाल म्हणण्यास सुरुवात केली. मागील सहा दशकांपासून देश, विदेशात कीर्तन  व प्रवचनाच्या माध्यमातून अध्यात्माचे विचार रुजविण्याचे काम बाबा महाराज करत होते. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती.  बाबा महाराजांच्या पत्नी हभप रुक्मिणी ऊर्फ माई सातारकर यांचे फेब्रुवारी महिन्यात निधन झाले होते.

निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह समाजातील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे. बाबा महाराज सातारकर हे मूळ मुंबईतील कांदेवाडी येथील. मात्र, त्यांच्या आजोबांना सातारा येथे वतन मिळाल्याने ते तेथे स्थायिक झाले होते. चार पिढ्यांपासून सातारकरांच्या घरात प्रवचन आणि कीर्तनाची परंपरा होती. स्वत: बाबा महाराज सातारकरांनीही ही परंपरा मोठ्या अभिमानाने जपून वाढवली. आता त्यांच्या कन्या हभप भगवती महाराज ती पुढे चालवत आहेत.

प्रशासनाकडूनही नवी मुंबईत तयारी 

बाबा महाराज सातारकर यांनी नवी मुंबईमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची उभारणी केली आहे. नेरूळमधील आगरी कोळी भवनजवळ त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या निधनानंतर राज्याच्या काेनाकोपऱ्यातून नागरिक व मान्यवर नवी मुंबईमध्ये येणार असल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व स्मशानभूमी परिसरात आवश्यक ती तयारी सुरू केली आहे.

 

Web Title: baba maharaj satarkar passes away the encyclopedia of spirituality is lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.