अवधूत तटकरेंचा राजीनामा
By Admin | Updated: December 12, 2015 01:46 IST2015-12-12T01:46:52+5:302015-12-12T01:46:52+5:30
येथील नगराध्यक्ष तथा श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार अवधूत अनिल तटकरे यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

अवधूत तटकरेंचा राजीनामा
रोहा : येथील नगराध्यक्ष तथा श्रीवर्धन मतदार संघाचे आमदार अवधूत अनिल तटकरे यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आमदार झाल्यानंतर अवधूत तटकरे यांनी नगराध्यक्षपद सोडले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांत नाराजी होती.
नगरसेवकांनी अवधूत तटकरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली पुन्हा सुरु केल्या होत्या. राजीनामा देण्यासाठी नगरसेवकांच्या वाढत्या दबाबामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. हे वृत्त रोह्यात येताच नगराध्यक्ष पदासाठी लॉबिंग सुरु झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रोह्याचे नगराध्यक्ष अवधूत तटकरे नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीवर्धन मतदार संघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर रोह्यातील अनेक इच्छुक पुरुष व महिला नगरसेवकांना नगराध्यक्षपदाची स्वप्ने पडू लागली होती. मात्र आ.अवधूत तटकरे यांनी राजीनामा देण्याबाबत कोणतीही अनुकूलता न दर्शविल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा देखील प्रयत्न यापूर्वी करण्यात आला होता. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाराज नगरसेवकांची समजूत काढल्याने अविश्वास ठरावाचे नाट्य पूर्णत्वास जाऊ शकले नाही.
काही दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा अवधूत तटकरे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी राष्ट्रवादीतील विरोधी नगरसेवकांनी हालचाली सुरु केल्या होत्या. या गोष्टीची कुणकुण अवधूत तटकरे यांना लागताच त्यांनी जिल्हाधिकारी शीतल तेली - उगले यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे समजते, यामुळे लवकरच रोहा नगरीला तटकरे कुटुंबियांव्यतिरिक्त नगराध्यक्ष काही काळासाठी लाभणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
येणाऱ्या नगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन अवधूत तटकरे यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव आणल्याची देखील चर्चा आहे. इच्छुक नगरसेवकांनी आपल्या नावाची शिफारस व्हावी यासाठी मोर्चेबांधणी चालू केली आहे.(वार्ताहर)