मशिदीत काम करणारा अटकेत
By Admin | Updated: March 7, 2015 01:09 IST2015-03-07T01:09:09+5:302015-03-07T01:09:09+5:30
शहरातील जामा मशीद येथे ११ फेब्रुवारी २०१४पासून बांगी म्हणून काम करणारा हुसेन अहमद अब्दुल हलिम या बांगलादेशी घुसखोराला गुरुवारी अटक करण्यात आली.

मशिदीत काम करणारा अटकेत
अलिबाग : शहरातील जामा मशीद येथे ११ फेब्रुवारी २०१४पासून बांगी म्हणून काम करणारा हुसेन
अहमद अब्दुल हलिम या बांगलादेशी घुसखोराला गुरुवारी अटक
करण्यात आली. तर हलिम हा बांगलादेशी घुसखोर असल्याचे
माहीत असूनही त्याची माहिती सरकारी यंत्रणेला दिली नाही म्हणून जामा मशिदीच्या विश्वस्तांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला
आहे.
हुसेन अहलिम याच्याकडे वैध पारपत्र आहे, मात्र त्याच्या व्हिसाची मुदत संपलेली असतानाही तो भारतात राहत होता. प्रवासी व्हिसावर असताना तो मशिदीत बांगी म्हणून कार्यरत होता असे अलिबाग पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात नमूद केले आहे. रायगड जिल्हा बांगलादेशी घुसखोर नागरिक शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राहुल कांबळे यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
फसवणूक केल्याचा विश्वस्तांचा दावा
‘हलिमने आमची फसवणूक केली,’ असा दावा जामा मशीद विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नसीम बुकबार्इंडर यांनी केला आहे. गेल्या वर्षी रमझानच्या महिन्यात हुसेन अहमद अब्दुल हलिम यास बांगी पदावर नियुक्त करण्याच्या वेळी त्याने तो भारतीय नागरिक असल्याचे सांगून कोलकाता येथील एका ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला व कोलकात्यातीलच शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला त्याने सादर केला होता. त्यामुळे त्याला बांगी या पदावर घेतले. पोलिसांना त्याची आमच्याकडे असलेली कागदपत्रे तपासासाठी हवी होती, ती आम्ही तत्काळ सादर करून, हलिमला पोलिसांच्या स्वाधीन केले, असेही बुकबार्इंडर यांनी सांगितले.