मालासह कंटेनर चोरणारी टोळी अटकेत
By Admin | Updated: December 22, 2015 00:45 IST2015-12-22T00:45:03+5:302015-12-22T00:45:03+5:30
कंटेनरचालकाला धाक दाखवून मालासह कंटेनर चोरून नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा कंटेनर व त्यामधील होंडा कंपनीच्या वाहनांचे स्पेअर पार्ट

मालासह कंटेनर चोरणारी टोळी अटकेत
नवी मुंबई : कंटेनरचालकाला धाक दाखवून मालासह कंटेनर चोरून नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा कंटेनर व त्यामधील होंडा कंपनीच्या वाहनांचे स्पेअर पार्ट असा ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेले तिघेही सराईत गुन्हेगार असून, पनवेल परिसरातील राहणारे आहेत.
कंटेनरचालक किसनपाल यादव (४२) यांच्यासोबत शनिवारी पहाटे ही घटना घडली होती. आशू ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रेलर घेऊन ते पनवेलमधील कोनगाव येथे चालले होते. यावेळी कंटेनरमध्ये होंडा कंपनीच्या वाहनांचे १६ लाख रुपये किमतीचे स्पेअरपार्ट्स होते. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धानसर टोलनाक्यालगत कंटेनर पोचला असता, पाठीमागून इको कारमधून आलेल्या तिघांनी कंटेनर पळवून नेला होता. कार आडवी लावून कंटेनर थांबल्यानंतर यादव यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधून तिघांनी त्यांना निर्जन स्थळी सोडले होते. यानंतर त्यांनी घटलेल्या प्रकाराची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त दिलीप सावंत व परिमंडळ २ चे उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी २४ तासांच्या आत तिघांना अटक करून त्यांच्याकडून कंटेनर व स्पेअरपाटर््स असा ३० लाख रुपये किमतीचा लुटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अजितसिंग सिंग (२८), मंगलप्रसाद वर्मा (२२) व रोशन यादव (२३) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघे पनवेलमधील खुराटी, रोहंजन व पेंधर गावचे राहणारे आहेत. तर त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली इको (एमएच ४६ डब्लू ९४४८) कारदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. त्यांचा चौथा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखा उपायुक्त दिलीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी साहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्यासह तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)