मराठी शाळांच्या पटसंख्येसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 02:40 IST2016-04-26T02:40:45+5:302016-04-26T02:40:45+5:30

विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविता यावी, यासाठी रायगड जिल्ह्यात विशेषकरून पनवेल तालुक्यात मराठी शाळांचा आटापिटा सुरू आहे.

Attempts for the ratification of Marathi schools | मराठी शाळांच्या पटसंख्येसाठी प्रयत्न

मराठी शाळांच्या पटसंख्येसाठी प्रयत्न

पनवेल : शिक्षकांना आगामी शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थी मिळविण्यासाठी ठिकठिकाणी जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविता यावी, यासाठी रायगड जिल्ह्यात विशेषकरून पनवेल तालुक्यात मराठी शाळांचा आटापिटा सुरू आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या संस्थाचालकांसह इतरांनी विद्यार्थी शोधण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहर आणि गावात आता शिक्षक पालकांसमोर विनवणी करीत असून, पालक व विद्यार्थ्यांना आमिष दाखवून दाखले मिळविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. विशेषत: शहराला लागून असलेल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसोबतच अनुदानित शाळांच्या गुरुजींना पटसंख्या टिकविण्यासाठी भटकावे लागत आहे.
गाव तेथे शाळा यातून अनेक जण संस्थाचालक-मालक झाले आहेत; मात्र वाढत्या शाळांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर झाला आहे. त्यातच पालकांचा पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकविण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना विद्यार्थी मिळणे दुरापास्त झाले आहे.
सर्वांनाच आता शहराची ओढ लागल्याने आणि त्यासाठी आवश्यक संसाधनेही उपलब्ध असल्याने ग्रामीण भागात आपल्या पाल्याला शिकविण्याची मानसिकता पालकांची राहिलेली नाही. परिणामी ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या वेगाने रोडावत आहे. पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सर्वाधिक महत्त्व देताना आढळून येतात. त्यामुळे मराठी शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. हीच बाब या शाळांवरील शिक्षकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
शिक्षक मात्र ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शोधात घरोघरी फिरताना दिसून येत आहेत. आपल्याच शाळेला विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, यासाठी पालकांना व त्यांच्या पाल्यांना विविध आमिषे दाखविली जात आहेत. शाळेचे महत्त्वही पटवून देण्यात येत आहे. शाळेचा निकाल, क्र ीडा साहित्य, मोफत पुस्तके व इतर शालेय साहित्य तसेच शाळेत चालणाऱ्या विविध उपक्र मांची माहिती शिक्षक पालकांना त्यांच्या घरी जाऊन देत आहेत. हीच शोकांतिका आदिवासी आश्रमशाळांची आहे. शिक्षकांना विद्यार्थी मिळविण्यासाठी झोपडपट्टी, वाडे आणि पाड्यावर भटकावे लागत आहे. यावेळी ग्रामीण भागातील पालकांमधूनही या शिक्षकांना विविध प्रश्न विचारून त्यांची कसोटीच बघितली जात आहे.

Web Title: Attempts for the ratification of Marathi schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.