पीडित महिलेच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
By Admin | Updated: February 15, 2016 03:10 IST2016-02-15T03:10:15+5:302016-02-15T03:10:15+5:30
आसाम येथून नोकरीच्या बहाण्याने आणलेल्या महिलेवर बलात्कार करून देहविक्रीसाठी कुंटणखाण्यात विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पीडित महिलेच्या मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
नवी मुंबई : आसाम येथून नोकरीच्या बहाण्याने आणलेल्या महिलेवर बलात्कार करून देहविक्रीसाठी कुंटणखाण्यात विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर महिलेच्या सहा वर्षीय मुलीवरही त्यांनी अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
आसाम येथून नोकरीच्या बहाण्याने पनवेल परिसरात आलेल्या पत्नीला देहविक्रीसाठी भाग पाडून दोन लहान मुलांनाही डांबून ठेवल्याची तक्रार पीडित महिलेच्या पतीने नवी मुंबई पोलिसांकडे केली होती. त्यानुसार दोन दिवसांत प्रकरणाचा छडा लावून गुन्हे शाखा पोलिसांनी पीडित महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलांचीही सुटका केली आहे. तसेच हरून शेख व मंजू मुल्ला या दोघांना अटकदेखील केली आहे. हरून याने त्याच्या परिचयाच्या आसामी महिलेला बेकरीत नोकरी देण्याच्या बहाण्याने पनवेलच्या खिडूकपाडा परिसरात आणले होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ही महिला पतीच्या परवानगीने दोन लहान मुलांसह तेथे आली होती. मात्र यावेळी हरून व त्याच्या साथीदाराने या महिलेवर बलात्कार करून धमकावले होते. त्यानंतर नोकरीच्या बहाण्याने मुंबईत नेऊन कुंटणखाण्यात देहविक्रीसाठी ४० हजारांना विकले होते. यावेळी मंजू मुल्ला हिने या महिलेला हरून व त्याच्या साथीदाराकडून विकत घेतले होते. तिथे अत्याचाराला सामोरे जाताना पीडित आसामी महिलेने ग्राहकाच्या मदतीने पतीपर्यंत ही बाब पोचवली होती. तिला कुंटणखाण्यात विकल्यानंतर तिच्या दोन लहान मुलांना हरून याने पनवेलमध्येच स्वत:च्या घरात डांबून ठेवले होते. पत्नी व मुलांच्या शोधात आलेल्या पतीने सदर प्रकाराची तक्रार गुन्हे शाखा पोलिसांकडे केली होती. त्यानुसार उपायुक्त दिलीप सावंत, साहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे, निरीक्षक पुष्पलता दिघे, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, जगदीश पाटील, विठ्ठल सापते, गोरख पवार यांच्या पथकाने कसून तपास करून अखेर अथक प्रयत्नानंतर त्यांनी मंजू मुल्ला हिच्या कुंटणखाण्यातून या महिलेची सुटका केली. तिची ६ वर्षांची मुलगी व ९ वर्षांचा मुलगा यांचीही खिडूकपाडामधून सुटका केली. (प्रतिनिधी)