नवी मुंबई पर्यावरणशील शहर बनविण्याचा प्रयत्न;महापालिका आयुक्तांनी घेतली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 23:39 IST2020-11-08T23:39:10+5:302020-11-08T23:39:23+5:30
''माझी वसुंधरा'' अभियान; महापालिका आयुक्तांनी घेतली बैठक

नवी मुंबई पर्यावरणशील शहर बनविण्याचा प्रयत्न;महापालिका आयुक्तांनी घेतली बैठक
नवी मुंबई : पर्यावरणाची जपणूक करून मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध करणे व जैवविविधतेला पूरक वातावरण निर्माण करणे, हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे ''माझी वसुंधरा'' अभियान राबविण्यात येणार आहे. नवी मुंबई शहराची पर्यावरणशील शहर म्हणून ओळख करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाच्या पंचतत्त्वांशी निगडित जीवनशैलीचा स्विकार करून शाश्वत व निसर्गपूरक जीवनपद्धती अंगीकारण्यासाठी ''माझी वसुंधरा'' हे विशेष अभियान राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राज्य स्तरावर राबविण्यात येत आहे. पर्यावरणाची जपणूक करून मानवी जीवन अधिकाधिक समृद्ध करणे व जैवविविधतेला पूरक वातावरण निर्माण करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवण्यात आलेले आहे.
२ ऑक्टोबर, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत शासनाने निश्चित केलेल्या ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात नवी मुंबई महानगरपालिका सहभागी असून, महापालिका आयुक्त बांगर यांनी अभियानाच्या अनुषंगाने विशेष बैठक घेऊन अभियानाच्या अनुषंगाने करावयाच्या कामांचा व राबविण्याच्या उपक्रमांचा कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.
यामध्ये पृथ्वी तत्त्वाच्या अनुषंगाने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, तसेच वायू तत्त्वाकरिता प्रदूषण कमी करून हवा गुणवत्तेत सुधारणा करणेविषयी केलेल्या कामांचे मूल्यमापन केले जाणार आहे. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता सुरेंद्र पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.