लिफ्टच्या बहाण्याने तरुणावर हल्ला
By Admin | Updated: June 16, 2017 02:38 IST2017-06-16T02:38:12+5:302017-06-16T02:38:12+5:30
अज्ञात कारणावरून तरुणावर दोघांनी हल्ला केल्याचा प्रकार नेरुळमध्ये घडला आहे. ओळखीचा फायदा घेवून मोटारसायकलवर लिफ्ट मागून काही अंतरावर

लिफ्टच्या बहाण्याने तरुणावर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अज्ञात कारणावरून तरुणावर दोघांनी हल्ला केल्याचा प्रकार नेरुळमध्ये घडला आहे. ओळखीचा फायदा घेवून मोटारसायकलवर लिफ्ट मागून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी हा हल्ला केला. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तुषार लकेश्री (२२) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो नेरुळ सेक्टर २० मधील राहणारा असून त्याच्यावर हल्ला करणारे दोघे देखील त्याच परिसरातील राहणारे आहेत.
तुषार हा मोटारसायकलवरून जात असताना त्या दोघांनी लिफ्ट मागितली. यावेळी दोघेही परिचयाचे असल्यामुळे तुषार याने त्यांना लिफ्ट दिली. परंतु काही अंतरावर गेल्यानंतर एकांताच्या ठिकाणी दोघांनी तुषारला मोटारसायकल थांबवायला सांगितली.
यावेळी दोघांपैकी एकाने पाठीमागून तुषारवर चाकूने वार करून पळ काढला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर काहींनी जखमी तुषारला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर वेळीच उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचू शकले आहेत. घडलेल्या घटनेप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामध्ये छाजेश गायकवर व त्याच्या मित्राचा समावेश असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले. त्यांनी तुषार याच्यावर हल्ला का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.