‘अतिक्रमण’चे पोलीस ठाणे जुन्या मुख्यालयात
By Admin | Updated: September 11, 2015 01:42 IST2015-09-11T01:42:06+5:302015-09-11T01:42:06+5:30
अतिक्रमण विभागासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या जुन्या मुख्यालयाच्या सातव्या मजल्यावरील ५२२ चौरस मीटर जागा त्यासाठी उपलब्ध

‘अतिक्रमण’चे पोलीस ठाणे जुन्या मुख्यालयात
नवी मुंबई : अतिक्रमण विभागासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालिकेच्या जुन्या मुख्यालयाच्या सातव्या मजल्यावरील ५२२ चौरस मीटर जागा त्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सिडको व एमआयडीसीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. झोपड्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी महापालिकेस पोलीस बंदोबस्ताची गरज असते. अनेक वेळा बंदोबस्ताअभावी कारवाई थांबवावी लागते. यामुळे अतिक्रमण विभागासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्माण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या पोलीस स्टेशनमध्ये ३६ अधिकारी व जवळपास १०६ कर्मचारी असणार आहेत. यांच्यासाठी बैठक व आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्याची सूचना शासनाने केली आहे. अतिक्रमण विभागाने जुन्या मुख्यालयामधील जागेचीमागणी केली होती.
सातव्या मजल्यावरील ५२२ चौरस मीटर जागा पोलीस ठाण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे.
महापालिकेने जुन्या मुख्यालयातील तळमजला, पहिला, सातवा व आठवा मजला भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. परंतु फक्त कोकण रेल्वेची निविदा आली होती. यामुळे ती रद्द करण्यात आली. दरम्यान, राजमाता जिजाऊ मिशन माता बाल आरोग्य व पोषण मिशनसाठी आठव्या मजल्यावरील २६१ चौरस मीटर जागा, एनएमएमटीसाठी सातव्या मजल्यावरील ५२२ चौरस मीटर जागा देण्याचे निश्चित करण्यात आले असून आठव्या मजल्यावरील १०४५ चौरस मीटर जागेसाठी पुन्हा भाडे निश्चित करून निविदा मागविण्याच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने नुकतीच मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)