सिडकोकडून मालमत्तांचे होणार संगणकीकरण

By Admin | Updated: July 13, 2016 02:16 IST2016-07-13T02:16:27+5:302016-07-13T02:16:27+5:30

संपादित केलेल्या सर्व जमिनींच्या सातबाऱ्यावर आपले नाव चढविण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सिडकोने आता विविध प्रयोजनांसाठी वितरीत केलेल्या सर्व

Assets will be computerized in Cedecokoda | सिडकोकडून मालमत्तांचे होणार संगणकीकरण

सिडकोकडून मालमत्तांचे होणार संगणकीकरण

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई
संपादित केलेल्या सर्व जमिनींच्या सातबाऱ्यावर आपले नाव चढविण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सिडकोने आता विविध प्रयोजनांसाठी वितरीत केलेल्या सर्व मालमत्तांचे संगणकीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या माध्यमातून कोणता भूखंड कोणाला व कोणत्या प्रयोजनासाठी वितरीत केला आहे, याचा अद्ययावत तपशील संगणकाच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
नवी मुंबईची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाने सिडकाच्या माध्यमातून ठाणे, पनवेल आणि उरण तालुक्यातील ३४३.७ चौरस किलोमीटरचा भूभाग संपादित केला. शहराची निर्मित्ती करताना सिडकोने विविध प्रयोजनांसाठी भूखंडांचे वाटप केले आहे. यात गृहनिर्माण संस्थांसह शैक्षणिक संस्था, रुग्णालये, सामाजिक व सांस्कृतिक संस्था, मार्केट्स, व्यावसायिक गाळे आदींचा समावेश आहे. तसेच शहर नियोजनाचा एक भाग म्हणून नोडनिहाय क्रीडांगणे आणि उद्यानासाठी भूखंड आरक्षित केलेले आहेत. सामाजिक उपक्रमांसाठी राखीव असलेले अनेक भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. तसेच मागील २५ वर्षांत साडेबारा टक्के योजनेअंतर्गत हजारो भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. हे सर्व भूखंड ६0 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर वितरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे वितरीत केलेल्या या भूखंडांचा विद्यमान लीज होल्डरसह अद्ययावत तपशील उपलब्ध करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यानुसार सिडकोच्या संबंधित विभागाने कोणत्या नोडमध्ये किती व कोणत्या प्रयोजनासाठी भूखंड वितरीत केले आहेत, त्याचे सुरुवातीचे लीजहोल्डर कोण होते, सध्या ते कोणाच्या नावे हस्तांतरित झाले आहे, याचा तपशील गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याने ती पूर्णत्वास येण्यास मोठा कालावधी लागणार आहे. असे असले तरी सिडकोने ही जोखीम पत्करली असून, पुढील काही वर्षांत भूखंडांचा अद्ययावत डेटा संगणकाच्या एका क्लिकवर नागरिकांना उपलब्ध होईल, असा विश्वास सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी व्यक्त केला आहे.
सिडकोने खासगी शेतीच्या १५ हजार हेक्टरसह वन आणि शासकीय मालकीच्या जमिनी संपादित केल्या आहेत. वन आणि शासकीय जमिनीच्या सातबाऱ्यांवर सिडकोचे नाव पडले आहे. परंतु शेतकऱ्यांकडून संपादित केलेल्या जागेच्या सातबाऱ्यावर मात्र आतापर्यंत मूळ मालकाचेच नाव होते. या पार्श्वभूमीवर संपादित केलेल्या जवळपास १५ हजार हेक्टर जागेच्या सातबाऱ्यावर सिडकोचे नाव टाकण्याचे महत्त्वपूर्ण काम सिडकोने पूर्ण केले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित केलेल्या ७६१ हेक्टर जमिनीचा सातबाराही सिडकोने आपल्या नावावार करून घेतला आहे. त्यापाठोपाठ भूखंडांच्या भाडेपट्ट्याचा तपशील संकलित करण्याची मोहीम सिडकोने हाती घेतली आहे. त्यामुळे एखादा भूखंड पूर्वी कोणाच्या नावावर होता आणि सध्या कुणाच्या नावे हस्तांरित आहे, ही माहिती नागरिकांना सहजरीत्या उपलब्ध होणार आहे.

Web Title: Assets will be computerized in Cedecokoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.