रिक्षा चालकावर खुनी हल्ला
By Admin | Updated: December 11, 2015 01:35 IST2015-12-11T01:35:30+5:302015-12-11T01:35:30+5:30
करावे गावामधील रिक्षा चालक मच्छींद्र भोईर बुधवारी रात्री प्रवाशांना सोडण्यासाठी उलवे परिसरात गेला होता. परत येताना गुंडांनी त्याला गंभीर जखमी करून पैसे लुटून नेले

रिक्षा चालकावर खुनी हल्ला
नवी मुंबई : करावे गावामधील रिक्षा चालक मच्छींद्र भोईर बुधवारी रात्री प्रवाशांना सोडण्यासाठी उलवे परिसरात गेला होता. परत येताना गुंडांनी त्याला गंभीर जखमी करून पैसे लुटून नेले. जखमी अवस्थेमध्ये त्याने व्हिडीओ काढून मित्रांना पाठविला असून मी जगणार नाही, माझ्या घरच्यांना कळवा, असे आवाहन केले असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
बुधवारी रात्री करावे परिसरातील रिक्षा चालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मच्छींद्र भोईर या तरूणाने स्वत:चा व्हिडीओ पाठविला. मी भाडे घेवून उलवेला गेला होतो. फॅमिली होती म्हणून गेलो. तेथून येताना चार जण भेटले. किल्ला गावठाणजवळ जायचे असल्याचे सांगितले. मी त्यांना गाडीत बसविले. ते दारू पिले होते. त्यांनी रिक्षा आडवळणाला घेण्यास सांगितले. मला मारहाण केली. मला खूप लागले आहे. आमच्या घरी लवकर सांगा. मी वाचणार की नाही सांगता येत नाही, हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावरील वेदना व्हिडीओवर स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओमुळे करावे व बेलापूर परिसरात खळबळ उडाली आहे. रिक्षा चालकांनी याविषयी एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी डॉगस्क्वॉड घेवून पाहणी केली असता उरणकडे जाणाऱ्या जुन्या पुलाजवळ रिक्षा आढळली. रिक्षातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. शोधाशोध करूनही मच्छींद्र सापडलाच नाहती.
परिसरातील १०० पेक्षा जास्त रिक्षा चालकांनी बेलापूर ते उरण परिसरातील खाडी परिसरात दिवसभर शोध घेतला परंतु काहीच उपयोग झाला नाही. पोलिसांनीही शोध मोहीम सुरू केली आहे. परंतु रात्री उशिरापर्यंत तो सापडला नसल्याची माहिती रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रसन्ना कडू यांनी दिली आहे. रिक्षा चालकांनी दिवसभर रिक्षा बंद करून सहकाऱ्याचा शोध सुरू केला होता. चालकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेवून लवकर तपास लावण्याची मागणी केली आहे.