सहायक अभियोक्त्याला लाच घेताना अटक
By Admin | Updated: June 29, 2017 03:04 IST2017-06-29T03:04:20+5:302017-06-29T03:04:20+5:30
जामिनाच्या अर्जावर न्यायालयात म्हणने मांडण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक सरकारी अभियोक्त्याला अटक करण्यात आली आहे.

सहायक अभियोक्त्याला लाच घेताना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : जामिनाच्या अर्जावर न्यायालयात म्हणने मांडण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक सरकारी अभियोक्त्याला अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराने यासंबंधीची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली असता, त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली.
केदार गिरी (५८), असे कारवाई करण्यात आलेल्या सरकारी सहायक अभियोक्त्याचे नाव आहे. त्यांनी रबाळे येथील एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या तरुणाच्या जामीन अर्जावर न्यायालयात म्हणने मांडण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी केली होती. जामिनाच्या अर्जावर लवकर निकाल लागावा, याकरिता कोणताही अडथळा नको असल्यास गिरी यांनी लाच मागितली होती.
यामुळे अटकेत असलेल्या तरुणाच्या नातेवाइकांनी यासंबंधी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास सीबीडी येथील वाशी कोर्टात उपअधीक्षक भागवत सोनवणे, निरीक्षक धनाजी जळक यांच्या पथकाने सापळा रचला होता. या वेळी तक्रारदाराकडून चार हजार रुपयांची लाच घेताना केदार गिरी यांना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.