घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2016 02:40 IST2016-02-21T02:40:09+5:302016-02-21T02:40:09+5:30

बारमध्ये पैसे उडवत संबंध जोपासलेल्या बारबालांना पोसण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीच्या म्होरक्याने साथीदारांच्या मदतीने महाराष्ट्रासह

Arrested for burglary interstate gang | घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीस अटक

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीस अटक

नवी मुंबई : बारमध्ये पैसे उडवत संबंध जोपासलेल्या बारबालांना पोसण्यासाठी घरफोड्या करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीच्या म्होरक्याने साथीदारांच्या मदतीने महाराष्ट्रासह गुजरात, आंध्र प्रदेश अशा विविध ठिकाणी शंभरहून अधिक घरफोड्या केल्या आहेत. या गुन्ह्यांमधील चोरीचे सुमारे एक किलो वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
एनआरआय परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करीत असताना पोलिसांच्या हाती आंतराष्ट्रीय टोळी हाती लागली आहे. एनआरआय येथे घडलेल्या एका घरफोडीच्या घटनास्थळी सीसीटीव्हीमध्ये संशयित कार दिसत होती. सदर संशयित कार (एमएच २४ व्ही २८८०) सीबीडी येथील अश्वित लॉजच्या बाहेर उभी असल्याची माहिती पोलीसमित्रांमार्फत एनआरआय पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी सदर कारची झडती घेतली असता, कारमध्ये विविध क्रमांकांच्या नंबर प्लेट, दोन सोन्याच्या बांगड्या, सोन्याची चेन, कटावनी असे साहित्य आढळून आले. कारमधुन आलेल्या तिघांकडे यासंबंधीची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यानुसार पंचाक्षरी स्वामी (२९), मनोज रोम्हणे (२८) व अंगल बंडगर (२२) यांना ताब्यात घेण्यात आले होते.
त्यांचा गुन्हेगारीशी संबंध असावा, या संशयाने उपायुक्त शहाजी उमाप, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक अजित झांजुर्णे, उपनिरीक्षक अरविंद संखे, हवलदार विष्णू नरवाडे, संजय सोर, विनोद म्हात्रे यांचे पथक अधिक तपास करीत होते. चौकशीत स्वामी हा टोळीप्रमुख असून, साथीदारांच्या मदतीने त्याने महाराष्ट्रात विविध ठिकाणांसह गुजरात व आंध्र प्रदेशमध्येही घरफोड्या केल्याची बाब समोर आली. यानुसार तिघांवर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. तर अटक केलेल्या तिघांकडून नवी मुंबईतले ११ घरफोडीचे गुन्हे उघड झाल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांमधील चोरीचे ९७ तोळे सोन्याचे व २५ तोळे चांदीचे दागिने जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.
टोळीच म्होरक्या स्वामी याला काही वर्षांपूर्वी बारचा नाद लागला होता. यानुसार बारमध्ये दौलतजादा करण्यासाठी पैशाची गरज भागवण्यासाठी त्याने घरफोड्या करायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र बारबालांना पोसण्यासाठी त्याने टोळी तयार करून नवी मुंबईत विविध ठिकाणांसह अहमदाबाद-गुजरात, हैदराबाद- आंध्र प्रदेश या ठिकाणीही घरफोड्य केल्या आहेत.

स्वामी याने घरफोड्या करून जमवलेल्या पैशातून ६० लाख रुपये किमतीचा व्हिडिओ कॅमेरा खरेदी करून तो चित्रपटसृष्टीमध्ये भाड्याने दिला होता. याचे त्याला महिना दीड ते दोन लाख रुपये भाडेदेखील मिळत होते. मात्र मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा हा कॅमेरा जप्त केला आहे.

गुजरातमध्ये त्याच्याविरोधात
२७ गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला फरारही घोषित केलेले आहे. तर मुंबई पोलिसांनीही यापूर्वी त्याला अटक केलेली आहे. ज्या ठिकाणी घरफोड्या करायच्या असतील तिथे हे आलिशान कारमधून जाऊन लॉजमध्ये राहायचे. तर फेरफटका मारण्याच्या बहाण्याने पाहणी करीत सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही नसलेल्या इमारतीमध्ये प्रवेश करून बंद घरांमध्ये घरफोडी करायचे. अशाप्रकारे त्यांनी १०० हून अधिक गुन्हे केल्याची शक्यता आहे. यापूर्वीदेखील विविध ठिकाणच्या पोलिसांनी त्याच्याकडून एक किलो पेक्षा जास्त सोने जप्त केले आहे.

Web Title: Arrested for burglary interstate gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.