शहरातील शंभर जणांनी थकविले तब्बल ६० कोटी
By Admin | Updated: November 14, 2015 02:06 IST2015-11-14T02:06:47+5:302015-11-14T02:06:47+5:30
महापालिका पाणीपुरवठा विभागाने मोठ्या १०० थकबाकीधारकांची यादी प्रसिद्ध केली असून त्याकडून ६० कोटी रुपये येणे आहे.

शहरातील शंभर जणांनी थकविले तब्बल ६० कोटी
उल्हासनगर : महापालिका पाणीपुरवठा विभागाने मोठ्या १०० थकबाकीधारकांची यादी प्रसिद्ध केली असून त्याकडून ६० कोटी रुपये येणे आहे. एका महिन्यात पाणीबिल भरा, अन्यथा जप्तीला सामोरे जाण्याच्या नोटिसा काढल्याची माहिती उपायुक्त नितीन कापडनीस यांनी दिली.
उल्हासनगर पालिकेचे घरगुती पाणीबिल मालमत्ताकरात समाविष्ट असून वाणिज्य बिल स्वतंत्रपणे दिले जाते. त्याची थकबाकी १५० कोटींच्या पुढे गेल्याने सर्वाधिक १०० थकबाकीधारकांची यादी मनपाने प्रसिद्ध केली आहे. त्यांच्याकडे ६० कोटी ८४ लाख रुपये थकबाकी आहे. एका महिन्यात ती भरा, अन्यथा संपत्ती जप्तीच्या नोटिसा दिल्या असून यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात २०० पेक्षा जास्त जीन्स उद्योग, सेंच्युरी केमिकल कारखान्यांसह लहान-मोठे असंख्य उद्योग आहेत. पालिका त्यांना वाणिज्य दराने पाणीपुरवठा करीत असून यापैकी अनेकांनी पाणीबिल भरले नसल्याचे उघड झाले आहे. पाणीपुरवठा विभागाने त्यांच्याकडे ते भरण्यासाठी साकडे घातल्यानंतरही दाद देत नव्हते. अखेर, विभागाने जप्तीच्या नोटिसा काढून कारवाईचे संकेत दिले आहेत.