माथेरान नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजुरी
By Admin | Updated: June 2, 2017 05:45 IST2017-06-02T05:45:58+5:302017-06-02T05:45:58+5:30
येथील रहदारीची गहन समस्या निर्माण झाल्यामुळे मुख्य रस्त्यांवर पर्यटकांना तसेच नियमितपणे वर्दळ असलेल्या स्थानिकांना

माथेरान नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजुरी
माथेरान : येथील रहदारीची गहन समस्या निर्माण झाल्यामुळे मुख्य रस्त्यांवर पर्यटकांना तसेच नियमितपणे वर्दळ असलेल्या स्थानिकांना पायी चालताना घोड्यांच्या गर्दीमुळे तसेच लीदमिश्रित धुळीमुळे पायी प्रवास करणे अत्यंत त्रासदायक होत आहे. त्यामुळे घोड्यांना मुख्य रस्ता असणाऱ्या महात्मा गांधी मार्गावरून पूर्णत: बंदी करून त्यांची कस्तुरबा रोड मार्गे वाहतुक सुरू करण्यात यावी या मुख्याधिकारी घोलप यांच्या महत्त्वाकांक्षी निर्णयाचे नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वागत करण्यात आले.
नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नुकतीच नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित केली होती. यावेळी मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप, गटनेते प्रसाद सावंत यांसह विरोधी पक्षाचे विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदे आणि एकूण पंधरा सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सकारात्मक विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. दस्तुरी नाक्यावर पर्यटकांच्या सुखकर प्रवासासाठी त्यांची कुठल्याही प्रकारे दिशाभूल न होता योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी दस्तुरीच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवेश करून त्यांना योग्य माहिती मिळण्यासाठी घोडा, हातरिक्षा, हमालांचे वाजवी वाहतूक दर तसेच अन्य महत्त्वपूर्ण माहिती आॅडीयो क्लिपद्वारे समजून त्यांची दिशाभूल थांबावी, यासाठी आॅडीयो क्लिपची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी तेव्हाच दस्तुरी येथील पर्यटकांची पिळवणूक थांबेल, या गटनेते प्रसाद सावंत यांच्या पर्यटनाला वाव देणाऱ्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
नगरपालिकेत कामगार वर्ग अपुरा असल्याने येथील अनेक कामे खोळंबली आहेत. त्यासाठी येथे मानधनावर अथवा रोजगारावर कामगारांना सामावून घेण्यात यावे. सुशिक्षित बेकार युवकांना या माध्यमांतून रोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते, असेही प्रसाद सावंत यांनी मुख्याधिकारी घोलप यांना सूचित केले. नगरपालिकेतील सभापतींंच्या आपापल्या प्रभागातील विकासकामांबाबत आपल्याकडे माहिती पोहोचत नसल्याने सभापतींंच्या बद्दल नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरपालिकेच्या शाळेच्या बाबतीत विविध शैक्षणिक साहित्य तसेच अत्यावश्यक शालेय साधनसामुग्री खरेदीच्या विषयांचे वाचन तसेच पहिलीच्या विद्यार्थ्यांमार्फत वृक्षारोपण करण्याचा विषय शिक्षण सभापती नरेश काळे यांनी सूचवला. वनसमिती गठित करण्याच्या विषयांवर सत्ताधारी गटाने आम्ही या समितीसाठी नावे तयार केली आहेतच, असे सूचित केल्यावर विरोधी पक्षाचे शिवाजी शिंदे यांनी आमच्याकडून सुद्धा काही नावे या समितीवर घ्या, असे स्पष्ट केल्यावर हे प्रकरण अधिक चिघळू नये, यासाठी नव्या वनसमितीच्या निवडीचे प्रकरण तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. यावेळी अभियंता देवेंद्र मोरखंडीकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
नव्याने काढलेल्या निविदेबाबतीत केवळ सत्ताधारी गटातील कार्यकर्त्यांना निविदेत स्थान न मिळाल्यामुळे १२ मे रोजी पावसाळ्यात होणाऱ्या कामांच्या निविदा वर्तमानपत्रात चार दिवसांतच प्रसिद्ध झाल्याबाबतीत सत्ताधारी मंडळींना ही निविदा रद्द करण्याबाबतसुद्धा काही कर्मचारी वर्गाने प्रेरित केल्यावरून पक्षातील आपल्याच मर्जीतील कार्यकर्त्यांना ही कामे न मिळाल्यामुळे नवखे बांधकाम सभापती शकील पटेल यांनी ही निविदा आपल्याला मान्य नसल्याचे स्पष्ट केले, त्यास सत्ताधारी गटाने दुजोरा दिला.
नगरपालिकेतील सभापतींंच्या आपापल्या प्रभागातील विकासकामांबाबत आपल्याकडे माहिती पोहोचत नसल्याने सभापतींंच्या बद्दल नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.