31 इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:08 IST2020-12-19T01:08:24+5:302020-12-19T01:08:28+5:30
वाशी, नेरुळमधील चार सोसायट्यांचा समावेश; रहिवाशांना पालिकेचा दिलासा

31 इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी
नवी मुंबई : महापालिकेने पहिल्या टप्प्यात चार गृहनिर्माण सोसायट्यांतील ३१ इमारतींच्या पुनर्बांधणीला मंजुरी दिली आहे. राहण्यास अयोग्य असलेल्या अतिधोकायदायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. परंतु महापालिकेने आता सकारात्मक भूमिका घेतली असून, त्यानुसार वाशी व नेरूळ विभागातील चार गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्बांधणीला परवानगी देण्यात आली आहे.
नवी मुंबईतील ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती अतिधोकादायक व राहण्यास अयोग्य असल्याचे महापालिकेने घोषित केले आहे. तसेच या इमारतींचा निवासी वापर तत्काळ बंद करण्याचे आवाहन संबंधित रहिवाशांना केले आहे. विशेष म्हणजे या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न मागील पाच वर्षांपासून रखडला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली आयडेंटीफिकेशन कमिटी (ओळख समिती) गठीत करण्यात आली आहे. या समितीत सिडकोचे मुख्य नियोजनकार, सिडकोचे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग ठाण्याचे अधीक्षक अभियंता, कोकण विभागीय नगररचना विभागाचे सह संचालक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता हे सदस्य आहेत. या समितीच्या माध्यमातून आलेल्या प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. पुनर्विकासासाठी प्रस्तावित इमारतींची समितीने १५ आणि १७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर या समितीने आयुक्त बांगर यांना अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे समितीचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त बांगर यांनी पहिल्या टप्प्यात चार सोसायट्यांतील ३१ इमारतींच्या पुनर्विकासाला मंजुरी दिली आहे. यात वाशी विभागातील तीन तर नेरूळमधील एका सोसायटीचा समावेश आहे.
विशेष म्हणजे या सोसायटीधारकांना बांधकाम परवानगीसाठी अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच बांधकाम परवानगी मिळण्याचा मार्गसुद्धा सुकर करण्यात आला आहे. बांधकामासाठी ३ चटई निर्देशांक मिळणार असून, त्यानुसार बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महापालिकेने संबंधित सोसायटीधारकांना केले आहे.
३० वर्षांपेक्षा जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठीचे हे नियोेजन आहे. असे असले तरी ३० वर्षांपेक्षा कमी परंतु धोकादायक ठरलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाठीसुद्धा परवानगी मिळावी, यादृष्टीने राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका
स्वीकृती मिळालेल्या सोसायट्या
निवस्ती गृहनिर्माण सोसायटी, बी-३ टाईप अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन, सेक्टर २, वाशी.
लिटिल फ्लॉवर सोसायटी, सेक्टर ९, वाशी
उत्कर्ष सोसायटी, (जे.एन.२ टाईप - इमारत क्र. ६१,६२,६३), सेक्टर ९, वाशी.
पंचशील अपार्टमेंट, बिल्डिंग क्रमांक १ ते १७ सेक्टर १ए, नेरूळ.