नारायण जाधव
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रस्तावित एरोसिटीसह आम्र मार्ग, जेएनपीए बंदर आणि तरघर रेल्वेस्थानकाला जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या पश्चिम परिघीय कॉरिडॉरच्या मार्गातील सीआरझेडसह केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाचा अडथळा दूर झाला आहे. तीन किलोमीटर लांबीच्या या बांधकामास केंद्राच्या परिवेश समितीने परवानगी दिल्यामुळे सिडकोला मोठा दिलासा मिळाला आहे.
पश्चिम परिघाय कॉरिडोरचे बांधकामासाठी ४४ कोटी ४८ लाख खर्च होणार असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळ आणि एरोसिटीसह तरघर रेल्वेस्थानक यांच्यात अखंड आणि सुरळीत रस्ते वाहतूक करणे सोपे होणार आहे. शिवाय विमानतळ आणि जेएपीए बंदर येथील वाहतूक स्वतंत्रपणे आणि सुरळीत चालू ठेवता येणार आहे.
तरघर रेल्वेस्थानकाला हाेणार फायदा
हा मार्ग थेट एरोसिटी आणि तरघर रेल्वेस्थानकाला जोडण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात एरोसिटीतील विविध आस्थापनास रोजगारासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह रहिवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.
तरघर हे नेरूळ-उरण कॉरिडॉरचा भाग असून, या कॉरिडोरच्या मदतीने विमानतळाच्या प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
झाडांचा जाणार बळी
कॉरिडोरमध्ये मार्गात मँग्रोव्ह बाधित होणार नसले तरी तो सीआरझेड क्षेत्रातून जाणार आहे. यामुळे बांधकाम करण्याआधी उच्च न्यायालयाकडून पूर्व वनमंजुरी घेणे आवश्यक आहे. शिवाय मार्गात २३२ झाडांचा बळी जाणार असून, यातील ८५ झाडे खासगी वनातील आहेत.
असा आहे कॉरिडोर
कॉरिडॉरची लांबी ३ किमी आहे. पूर्वेस ४० मीटर रुंदीचा, ३-लेनचा दुहेरी कॅरेजवे रस्ता प्रस्तावित आहे, ज्यामध्ये आम्र मार्ग, विमानतळाला जोडणारे तीन जंक्शन समाविष्ट आहेत. त्याच्या पश्चिमेस, सायकलिंग ट्रॅक, लँडस्केपिंगदेखील प्रस्तावित आहे, त्यानंतर ११ मीटर रुंदीचा ईएचव्हीटी डक्ट रोड आहे.
वाहतूककाेंडी टळणार
सध्या आम्र मुख्यत्वे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे येणाऱ्या अवजड वाहतुकीसाठी वापरला जातो. विमानतळासाठीही दोन लेन असल्याने भविष्यात मोठी वाहतूककोंडी निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळेच हा कॉरिडोर कसा गरजेचा आहे, हे सिडकोचे म्हणणे परिवेश समितीने मान्य केले आहे.