जिल्ह्यात १८८ विंधण विहिरींना मंजुरी
By Admin | Updated: April 20, 2016 02:32 IST2016-04-20T02:32:04+5:302016-04-20T02:32:04+5:30
रायगड जिल्ह्यातील बहुतांश गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेंतर्गत १८८ विंधण विहिरींना मंजुरी दिली आहे

जिल्ह्यात १८८ विंधण विहिरींना मंजुरी
आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्ह्यातील बहुतांश गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेंतर्गत १८८ विंधण विहिरींना मंजुरी दिली आहे. यासाठी सुमारे ८८ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. प्रशासनाचे हे धोरण म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदण्यासारखे असल्याचे दिसून येते.
रायगड जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडूनही पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्याचा हा फटका आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वात असणाऱ्या धराणांतील वर्षानुवर्षे गाळच काढलेला नाही. त्यामुळे नदीच्या पात्रामध्ये कमी पाणी जमा होते. काही ठिकाणच्या तर पाणीपुरवठ्याच्या योजनाच या अर्धवट स्थितीत पडून असून, काही योजना या दुरुस्तीअभावी रखडलेल्या आहेत. याचा एकत्रित परिणाम म्हणून पाणी समस्या निर्माण झाली असल्याचे दिसून येते.
रायगड जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने १५ तालुक्यांमध्ये ५७७ विंधण विहिरी खोदण्यास टंचाई कृती आराखड्यात स्थान दिलेले आहे. मात्र सध्या प्रत्यक्षात गरज लक्षात घेता १८८ विंधण विहिरींना नुकतीच मान्यता दिली आहे. काही तालुक्यांमध्ये १५ तर काही तालुक्यांमध्ये २० विंधण विहिरींच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. यासाठी प्रत्येकी ४७ हजार रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता अरविंद टोरो यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जिल्हा परिषदेकडे सध्या १० लाख रुपयांचा निधी शिल्लक आहे. कामे सुरू केल्यावर लागेल तसा निधी प्राप्त केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईची समस्या ही साधारणपणे एप्रिल महिन्यात सुरू होते आणि एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून उग्ररूप धारण करते. त्यामुळे नागरिकांची विशेषत: महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.