वशिलेबाजीत रखडल्या नियुक्त्या
By Admin | Updated: February 29, 2016 02:14 IST2016-02-29T02:14:13+5:302016-02-29T02:14:13+5:30
आयुक्तालयातील पाच रिक्त पदांसाठी चार साहाय्यक आयुक्त उपलब्ध होऊनही काहींच्या वशिलेबाजीमुळे सर्वांच्याच नियुक्ती रखडल्या आहेत

वशिलेबाजीत रखडल्या नियुक्त्या
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
आयुक्तालयातील पाच रिक्त पदांसाठी चार साहाय्यक आयुक्त उपलब्ध होऊनही काहींच्या वशिलेबाजीमुळे सर्वांच्याच नियुक्ती रखडल्या आहेत. एकापेक्षा जास्त साहाय्यक आयुक्तांनी पनवेलच्याच जागेवर दावा केला असून, त्यांच्यासाठी मंत्रालयातून शिफारशी येत असल्याचेही समजते. त्यामुळे पनवेलच्या हट्टामागचे गूढ काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सद्य:स्थितीला साहाय्यक आयुक्त पदाच्या पाच जागा रिक्त असून, त्यामध्ये वाहतूक शाखेची दोन, मुख्यालय, पनवेल, उरण व पोर्ट या ठिकाणांचा समावेश आहे. या रिक्त जागा भरून काढण्यासाठी इतर ठिकाणच्या चार साहाय्यक आयुक्तांची नियुक्ती नवी मुंबई आयुक्तालयात झालेली आहे. त्यापैकी तिघांना बढती मिळाली असून एक बदलीवर आले आहेत. गणेश गायकवाड, श्रीनिवास मुंडे, नितीन कौसडीकर व प्रकाश निलेवाड अशी त्यांची नावे आहेत. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात रुजू झाले आहेत. मात्र रिक्त जागा पाच व उपलब्ध अधिकारी चार असतानाही त्यांच्या पदभाराचा निर्णय आयुक्त स्तरावर रखडला आहे. हजर झालेल्या चौघांपैकी काहींनी पनवेलच्या रिक्त साहाय्यक आयुक्त पदावर दावा केला आहे. यासाठी त्यांची मंत्रालयातून जोरदार वशिलेबाजी सुरू असून त्यांच्यासाठी आयुक्तांकडे शिफारस पत्रेही येत असल्याचे सूत्रांकडून समजते. यामुळे दोन महिन्यांपासून चारही अधिकाऱ्यांच्या नियुक्ती रखडल्या आहेत. वाहतूक शाखेत एका परिमंडळासाठी एक साहाय्यक आयुक्त असल्याने त्यांचे कार्यक्षेत्र परिमंडळ उपायुक्ताएवढे आहे. असे असतानाही सात पोलीस ठाण्यांचा समावेश असलेल्या पनवेलच्या जागेसाठी ते इच्छुक आहेत. पनवेलच्या जागेबाबत त्यांच्यातल्या उत्सुकतेचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही. सदर ठिकाणच्या साहाय्यक आयुक्तपदी यापूर्वी शेषराव सूर्यवंशी कार्यरत होते. पोर्टच्या साहाय्यक आयुक्त कार्यक्षेत्रात उरण, न्हावाशेवा व मोरा या तीन पोलीस ठाण्यांचा समावेश असून त्याअंतर्गत जेएनपीटी, विमानतळ व सिडकोच्या नैना क्षेत्राचाही समावेश आहे. उद्योग व्यवसायामुळे आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने हे क्षेत्र मोठे असून, येत्या काळात त्याची व्याप्ती अधिक वाढणार आहे. असे असतानाही त्या ठिकाणच्या साहाय्यक आयुक्तपदाला त्यांची नापसंती आहे.