एपीएमसीतील जुना गांजा अड्डा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:41 IST2017-08-02T02:41:50+5:302017-08-02T02:41:52+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोलिसांना हुलकावणी देऊन सुरू असलेला सर्वात जुना गांजा अड्डा अमली पदार्थ विरोधी पथकाने उद्ध्वस्त केला

एपीएमसीतील जुना गांजा अड्डा उद्ध्वस्त
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोलिसांना हुलकावणी देऊन सुरू असलेला सर्वात जुना गांजा अड्डा अमली पदार्थ विरोधी पथकाने उद्ध्वस्त केला आहे. कालिंदा ऊर्फ कविता हिरा कुराळे हिला अटक केली असून, तिच्याकडून २ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने वर्षभरामध्ये शहरातील बहुतांश गांजाविक्रीचे अड्डे उद्ध्वस्त केले असून, आतापर्यंत ३५पेक्षा जास्त आरोपी गजाआड केले आहेत. मुंबई बाजार समिती परिसरामध्ये १५ ते २० वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या टारझन, अशोक पांडे सारख्या आरोपींनाही गजाआड केले होते; परंतु सेक्टर-१९मधील इलाहाबाद बँकेच्या बाजूला एकतानगर झोपडपट्टीमध्ये सुरू असलेला कविता हिरा कुराळे या महिलेचा अड्डा बंद होत नव्हता. गांजा विक्री करण्यासाठी परिवारातील व ओळखीच्या जवळपास २५ जणांनी टीमच तयार केली केली होती. पोलिसांनी एकावर कारवाई केली की, काही दिवसांमध्ये दुसरी व्यक्ती त्याच ठिकाणी किंवा परिसरामध्ये व्यवसाय सुरू करत होती. गांजाचा जादा साठाही ठेवला जात नसल्याने कारवाई करण्यास अडथळे येत होते. अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राणी काळे व त्यांच्या पथकाला या ठिकाणी गांजा विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ३१ जुलैला एपीएमसी परिसरामध्ये सापळा रचण्यात आला होता. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कविता कुराळे गांजा विक्रीसाठी या परिसरामध्ये आली असताना, विशेष पथकाच्या टीमने तिला ताब्यात घेतले. पंचांच्या समक्ष झडती घेतली असता, तिच्याजवळील प्लास्टिकच्या पिशवीमध्ये २ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला आहे. २१ हजार ७०० रुपयांचा गांजा जप्त करून तिला अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपीला एपीएमसी पोलिसांनी २०१४ व २०१७मध्ये गांजा विक्रीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. याशिवाय मुंबईमध्येही तिच्यावर एक गुन्हा दाखल असल्याचे तपासात निदर्शनास आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त तुषार दोशी, नितीन कौसाडीकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, राणी काळे, अजित गोळे, अमोल कर्डिले, आकाश मुके, सुप्रिया ठाकूर, चौधरी, पिरजादे, भालेराव, सांगोळकर यांच्या पथकाने केली आहे.
झोपडपट्टीमध्ये
होता दबदबा
एकता नगर झोपडपट्टी परिसरामध्ये गांजा विक्री करणाºया कविताचा दरारा होता. येथे जर कोणी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला तर तत्काळ महिलांना व इतर नागरिकांना एकत्र करून आरडाओरड केली जात होती. यामुळे सहसा या अड्ड्याच्या वाट्याला कोणी जात नव्हते. पोलिसांना सापडणार नाही याची काळजी घेऊन व्यवसाय केला जात होता. वास्तविक येथील सर्व झोपड्या हटवून भूखंडाला संरक्षण कुंपण घालावे, अशी मागणी होत आहे.
पोलिसांचे कौतुक
झोपड्यातील अड्डा कधीच बंद होऊ शकत नाही असा दावा या परिसरामध्ये यापूर्वी गांजा विक्री करणारे अनेक जण करत होते. अनेकांचा या अड्ड्याला आशीर्वाद असल्याचेही बोलले जात होते. परंतु अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, उपनिरीक्षक राणी काळे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमुळे अमली पदार्थ विरोधी पथकाचे एपीएमसी परिसरामध्ये कौतुक होवू लागले आहे.