एपीएमसी कर्मचाऱ्यांची दुष्काळग्रस्तांना मदत
By Admin | Updated: October 28, 2015 01:06 IST2015-10-28T01:06:39+5:302015-10-28T01:06:39+5:30
राज्यातील सर्व बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.

एपीएमसी कर्मचाऱ्यांची दुष्काळग्रस्तांना मदत
नवी मुंबई : राज्यातील सर्व बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दिला असून, सर्व नागरिकांनी शक्य ती मदत करावी, असे आवाहन केले आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे. देशातील सर्व नैसर्गिक आपत्तींमध्ये येथील कर्मचारी व व्यापाऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. २०१२ मधील दुष्काळावेळी माथाडी कामगारांनीही मदत केली होती. यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे बाजार समितीचे सचिव शिवाजी पहिणकर, माथाडी नेते शशिकांत शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांना दिला आहे. माथाडी संघटनाप्रणीत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी व कर्मचारी संघटना व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी सेनेने पत्र देऊन या प्रस्तावास सहमती दिली आहे. बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केली आहे.
बाजार समिती मुख्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत देण्याचे आवाहन केले. सचिव शिवाजी पहिणकर यांनी यासाठी दिलेल्या प्रोत्साहनासाठी त्यांचा सत्कारही करण्यात आला. पहिणकर यांनीही कर्मचाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. शेतकरी टिकला तर बाजार समित्या टिकणार आहेत. शेकरी संकटात असताना त्यांना मदत करणे सर्वांचे कर्तव्य असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी अविनाश देशपांडे, बी. डी. कामिटे, डी. जी. माकोडे, सीताराम कावरके, शिवनाथ वाघ, मिलिंद सूर्याराव, संदीप बोटे, कर्मचारी सेनेचे सुनील थोरात, नारायण महाजन, सुनील म्हात्रे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)