रविवारी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेची पेणकरांना उत्सुकता
By Admin | Updated: November 17, 2016 06:05 IST2016-11-17T06:05:25+5:302016-11-17T06:05:25+5:30
पेण नगरविकास आघाडीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. पेणमध्ये प्रचारसभा घेणार आहेत.

रविवारी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेची पेणकरांना उत्सुकता
पेण : पेण नगरविकास आघाडीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. पेणमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेकडे पेणच्या नागरिकांसह राजकीय विश्लेषकांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी पेणच्या जनतेला ग्रामीण भागासाठी एमएमआरडीएमधून पाणीपुरवठा योजनेसाठी ३० कोटींचा निधी दिला आहे. त्याचे हे दातृत्व पूर्वीच्या आघाडीच्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी पाळले नव्हते. यासाठी एक प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या होणाऱ्या प्रचार सभेत ते कोणता मास्टर स्ट्रोक मारतात याकडे राजकीय रणांगणावर विश्लेषक बारीक नजरा रोखून आहेत.
पेण नगरी सांस्कृतिक कला, क्रीडा व विद्येचे माहेरघर, कोकणचे पुणे व श्री गणेशाच्या निर्मात्यांची कलानगरी, मुंबईच्या हाकेवरचे शहर. या नगरीचा कायापालट होण्यासाठी भविष्यातील विकास आराखडा असल्याची ग्वाही रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी पेणच्या सभेत दिली. नगरविकास आघाडीमध्ये भाजपा १५ व शेकाप ५, राष्ट्रवादी १ अशा २१ जागांचे विभाजन होऊन नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपाचा आहे. त्यामुळे पेण शहराची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपाचे २ आमदार, पालकमंत्री, शेकाप आमदार अशा स्टार प्रचारक मंडळींचा राबता पेणमध्ये आहे. सत्तास्थानी असलेल्या काँग्रेसची कोंडी करण्याची व्यूहरचना झाली असून सोशल मीडिया, प्रचार चौक सभांमधून चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांची २० नोव्हेंबरची सभा निवडणूक कौलमध्ये यूटर्न घेणार, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.