राजपूतविरोधात दुसरा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2016 03:11 IST2016-02-24T03:11:36+5:302016-02-24T03:11:36+5:30
कोट्यवधीच्या घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या कपिल राजपूतविरोधात वाशी पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. द्वारका मिल्क व इतर कंपन्यांच्या नावे लक्झरी

राजपूतविरोधात दुसरा गुन्हा दाखल
नवी मुंबई : कोट्यवधीच्या घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या कपिल राजपूतविरोधात वाशी पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. द्वारका मिल्क व इतर कंपन्यांच्या नावे लक्झरी कारसाठी कर्ज घेवून त्याने पंजाब नॅशनल बँकेची सुमारे ९ कोटी ५० लाखांची फसवणूक केली आहे.
विविध बँकांना सुमारे तीनशे कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या कपिल राजपूत याच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. राजपूत याच्यासह त्याच्या पाच सहकाऱ्यांना वाशी पोलिसांनी यापूर्वीच आर्थिक फसवणूक प्रकरणी अटक केलेली आहे. त्यांच्याकडील पोलीस कोठडी संपताच सोमवारी न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी झाली आहे. अशातच त्याने पंजाब नॅशनल बँकेच्या वाशी शाखेची इतर एका प्रकारात ९ कोटी ५० लाखांची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. बँकेच्या वतीने यासंबंधीची तक्रार अनुपम प्रसाद यांनी वाशी पोलिसांकडे केली आहे. राजपूत याने सदर बँकेतून त्याच्या विविध कंपन्यांच्या नावे सुमारे २४ कार खरेदीसाठी कर्ज घेतले होते. आॅडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज अशा कोटीच्या घरातल्या या सर्व कार आहेत. यानुसार राजपूत व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास गुन्हे शाखा करणार आहे. यामुळे बँकेच्या कर्जावर घेतलेल्या कार शोधण्याची मोहीम लवकरच पोलिसांना हाती घ्यावी लागली आहे. त्यामध्ये राजपूत याच्याकडून घेतलेल्या कार वापरणारे अनेक जण पोलिसांच्या चौकशीच्या घेऱ्यात येण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)