महापालिकेचा वर्धापन दिन दिमाखात
By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:36+5:302016-01-02T08:34:36+5:30
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी नवी मुंबई महानगरपालिकेचा २४ व्या वर्धापन दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात नवी मुंबई महानगरपालिकेचे

महापालिकेचा वर्धापन दिन दिमाखात
नवी मुंबई : वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी नवी मुंबई महानगरपालिकेचा २४ व्या वर्धापन दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारीवर्गाकरिता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गायन, नृत्य तसेच नाट्याविष्कारेनी उपस्थित सर्वच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आले.
महापौर सुधाकर सोनवणे यांच्यासह उपस्थितांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण केली. देशाला स्वच्छतेचे कर्तव्य पार पाडण्याचे वचन देतो. आठवड्यातील किमान दोन तास आपल्या कार्यस्थळाच्या स्वच्छतेसाठी दिले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने आपले योगदान द्यावे, असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मागील वर्षभरातील उल्लेखनीय पुरस्कार, सन्मान, वैशिष्ट्यपूर्ण सुविधा, कामे यांचा आढावा घेतला. मागील वर्षात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई महानगरपालिकेस लाभलेले तृतीय मानांकन, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राज्यातील १० व देशातील ९८ शहरांमध्ये झालेली निवड, एनएमएमटी उपक्र माला दोन
राष्ट्रीय प्रोडक्टव्हिटी पुरस्कार मिळाले आहेत.
घनकचरा व्यवस्थापन प्रणालीस राष्ट्रीय पुरस्कार, महापालिका मुख्यालय वास्तूस ग्रीन बिल्डिंगचे सुवर्ण मानांकन, अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून यशस्वीरीत्या संपन्न झालेल्या महापालिका निवडणूक प्रणालीची राज्य निवडणूक आयोगाकडून प्रशंसा करण्यात आली आहे.
मलेरिया-डेंग्यू नियंत्रणासाठी महापालिका करीत असलेली कार्यवाही उत्तम असून, या प्रणालीचा कृती आराखडा देशभरात राबविण्याबाबत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या राष्ट्रीय सहसंचालकांकडून लाभलेली प्रशस्ती, भूतान देशाच्या तसेच देशभरातील महालेखाकारांच्या राष्ट्रीय अभ्यास समूहाने महापालिका प्रकल्पांची केलेली प्रशंसा अशा वर्षभरातील विविध उल्लेखनीय बाबींचा विशेष उल्लेख करीत यापुढील काळातही ही प्रगतिशील वाटचाल अशीच सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेता जयवंत सुतार, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, विद्यार्थी युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश म्हात्रे आणि इतर मान्यवर नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.