संतप्त जमावाने फोडले वीज मंडळ कार्यालय
By Admin | Updated: June 1, 2017 05:29 IST2017-06-01T05:29:30+5:302017-06-01T05:29:30+5:30
तालुक्यात सोमवारी मध्यरात्री २.३० वाजता वीज गायब झाली ती मंगळवारी रात्री दहापर्यंत आली नाही. यामुळे नागरिकांचा संयम

संतप्त जमावाने फोडले वीज मंडळ कार्यालय
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव/मुरुड : तालुक्यात सोमवारी मध्यरात्री २.३० वाजता वीज गायब झाली ती मंगळवारी रात्री दहापर्यंत आली नाही. यामुळे नागरिकांचा संयम सुटून सुमारे पाचशे लोकांच्या जमावाने वीज कार्यालयातील खिडकीच्या काचा, टेलिफोन व संपूर्ण कार्यालयाची तोडफोड केली. वीज मंडळ कार्यालयाच्या अंगणात ठेवलेल्या कारच्या काचा फोडून आपला राग व्यक्त केला. यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले. या घडलेल्या प्रकारानंतर मुरु ड शहरातील वीज कार्यालयात पोलिसांचा बंदोबस्त असून पोलिसांच्या अतिरिक्त तुकड्या देण्यात आल्या आहेत. यामुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
सध्याच्या परिस्थितीत मुरु ड तालुक्यात वारंवार वीज गायब होत आहे. कधी १६ तास तर कधी ८ तास वीज गायब झाल्याने जनता त्रस्त झाली आहे. वीज गायब झाल्यावर वीज मंडळ कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी पळून जातात, त्यामुळे नागरिकांना वीज कधी येणार या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. अधिकाऱ्यांचे फोन देखील बंद होते, यामुळे नागरिक संतप्त झाले. सध्या मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून विजेच्या लपंडावाने ते त्रस्त झाले आहेत. मंगळवारी १८ तासांपेक्षा अधिक काळ होऊनही वीज न आल्याने आणि एमएसईबी कार्यालयात कोणीही अधिकारी न भेटल्याने संतप्त नागरिकांनी तोडफोड के ली. यामुळे मुरुडमध्ये तणावग्रस्त परिस्थिती होती. तणाव निवळण्यासाठी पोलीस उपाधीक्षक दि.बी.निगोठ यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब पाटील, रोहा पोलीस निरीक्षक तसेच पोलीस दलाच्या आरसीबी व क्यूआरटी पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी केलेल्या दगडफेकीत मुरु ड पोलीस ठाण्याचे जमादार रमण महाले व पीएसआय संजय हेमाडे हे किरकोळ जखमी झाले आहे. सोमवारी मध्यरात्री गेलेली वीज ही दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी मध्यरात्री २.३० वाजता आली. तोपर्यंत संतप्त जमावाला पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब पाटील व पीएसआय हेमाडे यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला.
वीज कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्यावेळी तातडीने
मुरु ड तहसील कार्यालयात शांतता कमिटीची सभा घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजले.
सभेतील आश्वासने विरली हवेत
मुरु डमध्ये वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व इतर समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी, मुरुड तहसीलदार दालनात २५ मे रोजी तहसीलदार दिलीप यादव यांनी वीजमंडळाचे अधिकारी सचिन येरेकर, मानवअधिकारी संघटनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जहीद फकजी व त्यांचे सहकारी यांच्याबरोबर संयुक्त सभा घेतली.
जवळपास एक ते दीड महिन्यांपासून संपूर्ण मुरु ड तालुक्यामध्ये वीज वितरण कंपनीचा वीजपुरवठ्याबाबत सतत खेळखंडोबा चालू आहे. यामुळे संपूर्ण तालुक्याची जनता त्रस्त झाली आहे. याबाबत प्रश्नांचा भडिमार करण्यात आला होता.
त्यावेळी वीजपुरवठा योग्य होईल असे आश्वासन देण्यात आले होते,मात्र चोवीस तास वीज खंडित राहिल्याने नागरिकांच्या रागाचा उद्रेक झाला.