नागरिकांना स्वप्नातील घर निवडण्याची संधी - रकुल प्रीत सिंग
By योगेश पिंगळे | Updated: December 1, 2023 18:06 IST2023-12-01T18:06:24+5:302023-12-01T18:06:51+5:30
बीएएनएम - क्रेडाई यांच्या माध्यमातून २२व्या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाला शुक्रवारी वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सुरुवात झाली.

नागरिकांना स्वप्नातील घर निवडण्याची संधी - रकुल प्रीत सिंग
नवी मुंबई : वाशी येथे सुरू झालेल्या मालमत्ता आणि घरांच्या प्रदर्शनात विविध बिल्डर्सचे विविध प्रोजेक्ट असून, नागरिकांना एकाच छताखाली आपल्या स्वप्नातील घर निवडण्याची संधी मिळणार असल्याचे अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने सांगितले. बीएएनएम - क्रेडाई यांच्या माध्यमातून २२व्या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाला शुक्रवारी वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सुरुवात झाली. या प्रदर्शनाचे उदघाटन अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
नवी मुंबई शहरातील रिअल इस्टेटची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी विविध नामंकित बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून विविध मोठे प्रोजेक्ट उभारले जात असून, सर्व प्रकारच्या प्रॉपर्टी पाहण्यासाठी हे प्रदर्शन नागरिकांना मोठे व्यासपीठ असल्याचे अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने सांगितले. मागील २० ते २२ वर्षांपासून बीएएनएम - क्रेडाई यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरविले जाते. दरवर्षी साधारण ७० ते ८० स्टॉल या ठिकाणी लागतात आणि तत्काळ बुकिंगदेखील केले जाते. या प्रदर्शनामुळे नवी मुंबईतील कोणत्या भागात किती साईज आणि किमतीचे प्रकल्प सुरू आहेत, याची माहिती नागरिकांना मिळते. एकाच छताखाली एवढे प्रकल्प पाहता येणे ही नागरिकांसाठी मोठी संधी असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डिग्गीकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन अनेक दशकांपासून नवी मुंबई आणि त्यापुढील परिसराला आकार देणाऱ्या उद्योग क्षेत्रातील अनुभवी बांधकाम व्यावसायिकांनी केले असून, सदर प्रदर्शन ४ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून, परवडणारी घरे, लक्झरी अपार्टमेंट्स, व्यावसायिक मालमत्ता आदी समाविष्ट आहेत. बीएएनएम - क्रेडाई यांच्या माध्यमातून भरविण्यात आलेली घरे आणि मालमत्ता प्रदर्शनात २० लाखांपासून १५ कोटी रुपयांपर्यंच्या मालमत्ता उपलब्ध असून, दरवर्षीप्रमाणे ग्राहकांचा यंदाही चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास बीएएनएम- क्रेडाईचे व्यवस्थापकीय समितीमध्ये अध्यक्ष वसंत एम. भद्रा यांनी व्यक्त केला. यावेळी बांधकाम व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.