नवी मुंबई : भारतामधून अमेरिकेला पाठविलेला जवळपास ४ कोटी २८ लाख रुपयांचा आंबा तेथील विमानतळावर थांबविण्यात आला. कागदपत्रांमधील त्रुटींमुळे माल स्वीकारण्यास तेथील यंत्रणांनी नकार दिला आहे. सर्व माल तेथेच नष्ट करावा लागला असून, निर्यातदारांना नुकसान सहन करावे लागले. अमेरिकेला आंबा निर्यात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकीरण केंद्र सुरू केले आहे. येथे अमेरिकन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आंब्यावर विकीरण प्रक्रिया केली जाते.
कागदपत्रांमधील त्रुटीमुळे बसला फटकामे महिन्यात लॉस एंजिल्स, सॅन फ्रान्सिस्को व अटलांटा विमानतळावर जवळपास ४ कोटी २८ लाख रुपयांचे आंबे तेथील प्रशासनाने स्वीकारण्यास नकार दिला. अमेरिकेत आंबा पाठवताना विकीरण प्रक्रिया केल्यानंतर आवश्यक पीपीक्यू २०३ अर्जांवर सह्या केल्या जातात परंतु या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे हा आंबा स्वीकारण्यास नकार दिला. अमेरिकेने नाकारलेला आंबा परत भारतामध्ये आणणेही खर्चिक असल्यामुळे तो तेथेच नष्ट करावा लागला आहे. त्यामुळे निर्यातदारांना मोठा फटका बसला आहे. नक्की कोणाच्या चुकीमुळे हे घडले हे तपासण्याची मागणी केली जात आहे.
पणन मंडळाकडून चौकशी सुरू पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्याशी याविषयी माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता, याची चौकशी सुरू आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल तसेच अमेरिकेतील आंबा निर्यात थांबली नसून, ती सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.