रुग्णवाहिकांमध्ये बसवणार ‘जीपीएस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:31 PM2020-06-01T23:31:26+5:302020-06-01T23:31:37+5:30

नवी मुंबईत १८ बसचे रुग्णवाहिकांत रूपांतर : एनएमएमटीकडून चालकही उपलब्ध होणार; महापालिकेचा निर्णय

Ambulances to be fitted with 'GPS' | रुग्णवाहिकांमध्ये बसवणार ‘जीपीएस’

रुग्णवाहिकांमध्ये बसवणार ‘जीपीएस’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने रुग्णवाहिकांचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार केला आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात येत आहे. १८ प्रवासी बसचेही रुग्णवाहिकेत रूपांतर केले जात असून एनएमएमटी चालकांचीही मदत घेणार आहे. रुग्णवाहिकांना जीपीएस यंत्रणा बसविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून नवी मुंबईमध्येही रुग्णवाहिकांची कमतरता भासू लागली आहे. अनेक खासगी रुग्णवाहिकांनी सेवा देणे बंद केले आहे. सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिकाही बंद झाल्या आहेत. मनपाच्या रुग्णवाहिकांचा कोरोना रुग्णांसाठी वापर होत असल्यामुळे इतर रुग्णांची विशेषत: गरोदर महिलांनाही वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. याबाबतच्या तक्रारीही वाढल्या होत्या. ही समस्या दूर करण्यासाठी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मॅटर्निटी, कोविड व नॉन कोविड रुग्णांसाठी रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंझारे यांच्यावर रुग्णवाहिकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व संशयितांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका असेल. कोरोना व्यतिरिक्त आजारासाठी ६ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मॅटर्निटी प्रयोजनासाठी प्रत्येक रुग्णालयासाठी १ याप्रमाणे ३ रुग्णवाहिका, परिमंडळ एक व दोनसाठी प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण पाच रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जाणार आहेत.


रुग्णवाहिकांची मागणी वाढत आहे. यामुळे महापालिकेने एनएमएमटीच्या ताफ्यातील १८ बसचे रुग्णवाहिकेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी ८ बसचे रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित १० बसचेही रूपांतर करण्यात येणार आहे. याशिवाय आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून ३ रुग्णवाहिका घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले असून याविषयी प्रस्ताव ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.


महानगरपालिकेच्या मालकीच्या १३ रुग्णवाहिका, ९ पार्थिव व शववाहिन्या, जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून आलेल्या ९ रुग्णवाहिका व एनएमएमटी बसेसचे रूपांतर करून तयार केलेल्या १८ रुग्णवाहिका मिळून ५० रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहेत. या सर्व रुग्णवाहिकांना जीपीएस ट्रॅकर बसविण्यात येणार आहे.

चालकांचेही नियोजन
रुग्णवाहिकांवरील चालकांनाही कोरोनाची लागण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी चालक उपलब्ध होत नाहीत. यामुळे महापालिकेने चालकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. एनएमएमटीच्या चालकांचीही मदत घेतली जाणार आहे. तीन शिफ्टमध्ये चालकांचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी १५० चालक उपलब्ध करण्यात येणार आहेत.
पहिल्यांदाच स्वतंत्र विभाग
च्महापालिकेमध्ये रुग्णवाहिकांसाठी यापूर्वी स्वतंत्र विभाग नव्हता. प्रत्येक रुग्णालयनिहाय रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या. यामुळे त्यांच्यामध्ये समन्वय साधला जात नव्हता.
च्आता स्वतंत्र विभाग तयार केल्यामुळे एखाद्या रुग्णालयात रुग्णवाहिका उभी असेल तर त्याचा वापर इतर ठिकाणच्या रुग्णांना सेवा देण्यासाठीही करता येणार आहे.
च्यामुळे ठरावीक रुग्णवाहिकांवरच पडणारा ताण कमी होणार असून शहरवासीयांना चांगली सेवा देणे शक्य होणार आहे.

Web Title: Ambulances to be fitted with 'GPS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.