ईएसआयसीच्या कामगारांना पर्यायी घरे
By Admin | Updated: August 10, 2016 03:28 IST2016-08-10T03:28:32+5:302016-08-10T03:28:32+5:30
धोकादायक घोषित करूनही ज्या इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव्य आहे, अशा इमारती तत्काळ मोकळ्या करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत

ईएसआयसीच्या कामगारांना पर्यायी घरे
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
धोकादायक घोषित करूनही ज्या इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव्य आहे, अशा इमारती तत्काळ मोकळ्या करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. यामुळे वाशीतील कामगार रुग्णालयाच्या धोकादायक इमारतीमधील रहिवाशांची कुचंबणा झाली होती. महापालिकेसह कामगार रुग्णालय व्यवस्थापन देखील पर्यायी सोय न करता घरांचा ताबा सोडायला सांगत होते. अखेर सलग दोन दिवसांच्या चर्चेत कामगारांची व्यथा ऐकल्यानंतर प्रशासन त्यांना पर्यायी घरे देण्याबाबत सकारात्मक झाले आहे.
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी प्रसिध्द केलेल्या शहरातील धोकादायक इमारतींच्या यादीत वाशीतील कामगार रुग्णालयाच्या वसाहतीमधील चार इमारतींचा समावेश आहे. सदर इमारती जीर्ण अवस्थेत असून त्याठिकाणी सातत्याने प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडत आहेत. परंतु रुग्णालय व्यवस्थापनाकडून राहण्याची पर्यायी सोय अद्याप केलेली नसल्यामुळे अनेक कुटुंबे जीव मुठीत धरून राहत आहेत. कामगार रुग्णालयाच्याच वसाहतीमधील वापरात नसलेल्या इतर वर्गातल्या रिक्त इमारतींमध्ये घरे मिळावी असे कामगारांचे म्हणणे आहे. अनेक कामगार निवृत्तीच्या टप्प्यात असल्यामुळे तर काहींचा मुलांचा शिक्षणाखातर शहराबाहेर जाण्यास विरोध आहे. अशातच काही दिवसांपूर्वीच त्याठिकाणच्या इमारतींमध्ये छताचा भाग कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता असल्यामुळे सदर धोकादायक इमारती तत्काळ मोकळ्या करण्याच्या नोटिसा महापालिकेतर्फे रहिवाशांना बजावण्यात आल्या आहेत. त्याचवेळी रुग्णालय व्यवस्थापनाने देखील रहिवाशांना तत्काळ घरांचा ताबा सोडण्याच्या नोटिसा बजावल्या. मात्र इमारत मोकळी करताना पर्यायी राहण्याची व्यवस्था कामगारांनी स्वत: करावी, असा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला होता. यामुळे शासनाच्या ज्या विभागासाठी हे कामगार काम करतात, तो विभागच त्यांना वाऱ्यावर सोडत असल्याचा संताप कामगारांकडून व्यक्त होवू लागला होता.
वर्ग २ व ३ च्या रिक्त इमारती सुस्थितीमध्ये असल्यामुळे त्याठिकाणी राहण्याची पर्यायी सोय व्हावी अशी कामगारांची मागणी आहे. याकरिता वाशीतील कामगारांनी विद्यमान वैद्यकीय अधीक्षकांची भेट घेवून त्यांची व्यथा मांडली. यापूर्वी देखील कामगारांनी हा पर्याय सुचवला होता. परंतु तत्कालीन अधिकाऱ्यांनी कामगारांना उडवाउडवीची उत्तरे दिली होती.
अखेर विद्यमान अधिकाऱ्यांनी कामगारांसह सोमवारी मुंबईत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. त्यामध्ये वरिष्ठांनी कामगारांची झालेली कुचंबणा दूर करत त्यांना उपलब्ध इमारतीमध्ये पर्यायी घरे देण्याचे सूचित केले आहे.