विमानोड्डाणासोबत आता हॉटेल उद्योगालाही ‘बूस्टर’; नवी मुंबई विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेलची साखळी उभी राहणार
By कमलाकर कांबळे | Updated: October 15, 2025 10:30 IST2025-10-15T10:30:15+5:302025-10-15T10:30:29+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होताच अदानी एअरपोर्ट्स कंपनीने विमानतळाच्या ‘सिटी-साइड डेव्हलपमेंट’अंतर्गत ५० एकर क्षेत्रात पाच तारांकित हॉटेल्सची घोषणा केली आहे.

विमानोड्डाणासोबत आता हॉटेल उद्योगालाही ‘बूस्टर’; नवी मुंबई विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेलची साखळी उभी राहणार
- कमलाकर कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ८ ऑक्टोबर रोजी लोकार्पण झाल्यानंतर परिसरातील उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे. विशेषत: हॉटेल व हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला यामुळे बूस्टर मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यानुसार हॉटेल उद्योगातील नामवंत कंपन्यांनी विमानतळ परिसरात जागेसाठी चाचपणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, काही कंपन्यांनी या अगोदरच सिडकोकडून भूखंड घेतलेले आहेत. त्यामुळे पुढील काही वर्षांत विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल्सचे जाळे विणले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होताच अदानी एअरपोर्ट्स कंपनीने विमानतळाच्या ‘सिटी-साइड डेव्हलपमेंट’अंतर्गत ५० एकर क्षेत्रात पाच तारांकित हॉटेल्सची घोषणा केली आहे. यात सुमारे एक हजार खोल्या असतील. तसेच तीन ऑफिस टॉवर्स व एक मॉल उभारण्याचेसुद्धा नियोजन आहे. त्याचप्रमाणे विमानतळाच्या टर्मिनलमध्ये ८० खोल्यांचे ट्रांझिट हॉटेलही प्रस्तावित असून, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ते सोयीचे ठरणार आहे.
इकोसिस्टमला गती विमानतळामुळे कॉन्फरन्स, एक्झिबिशन सेंटरला मागणी वाढणार आहे. यासाठी अदानी समूहाच्या कन्व्हेन्शन सेंटर प्रकल्पाला हॉटेल्सची जोड मिळेल. बेलापूर-सीवूड्स-नेरूळहून शटल सेवा सुरू झाल्यानंतर हॉटेल्सच्या पिक-अप व ड्रॉप इकोसिस्टमलादेखील गती मिळणार आहे.
विशेष म्हणजे, जे. डब्ल्यू मेरिएटच्या हॉटेल प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. विमानतळ कॉरिडॉरजवळ पहिले लक्झरी हॉटेल म्हणून हा प्रकल्प आकार घेत आहे.
तसेच, सीबीडी बेलापूर येथील हॉटेल प्रकल्पालाही न्यायालयाने अलीकडेच हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यामुळे या भागातसुद्धा नव्या गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
१२३ एकत्र क्षेत्र राखीव
‘एरोसिटी’ प्रकल्पाच्या एकूण जागेपैकी १२३ एकर क्षेत्र निवासी, व्यावसायिक, रिटेलसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन.
एज्युसिटीसह विमानतळानजीकच्या खारघर, कामोठे, नवी पनवेल, उलवे, द्रोणगिरी या नोडसमध्ये हॉटेल्ससाठी सिडकोने भूखंड विक्रीची योजनाही जाहीर केली आहे.
‘एरोसिटी’ प्रकल्पाला सिडकोची गती
सिडकोने ६६७ एकर क्षेत्रावर ‘एरोसिटी’ प्रकल्प प्रस्तावित केला आहे. पुढील तीन महिन्यांत त्याचा मास्टर प्लॅन तयार केला
जाणार आहे.