आघाडीने उडवला महाआघाडीला धुव्वा
By Admin | Updated: December 22, 2015 00:41 IST2015-12-22T00:41:22+5:302015-12-22T00:41:22+5:30
तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि गोंधळपाडा विकास आघाडीने काँग्रेस-भाजपा-शिवसेना महाआघाडीला चांगलीच धूळ चारली आहे

आघाडीने उडवला महाआघाडीला धुव्वा
अलिबाग : तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि गोंधळपाडा विकास आघाडीने काँग्रेस-भाजपा-शिवसेना महाआघाडीला चांगलीच धूळ चारली आहे. आघाडीचे ११ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. आघाडीच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा एकच जल्लोष साजरा केला.
वेश्वी ग्रामपंचायतीच्या चार प्रभागातील ११ जागांसाठी १९ डिसेंबर १५ रोजी निवडणूक पार पडली होती. सोमवारी सकाळी १० वाजता अलिबाग तहसीलदार कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. सुमारे अर्ध्या तासातच निकाल समोर आले. मतमोजणीसाठी कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. काँग्रेस-भाजपा-शिवसेना महाआघाडीचे योगेश मगर आणि शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस- गोंधळपाडा विकास आघाडीचे नंदकुमार कदम या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये कदम यांना २४० तर, मगर यांना १७२ मते मिळाली. ६८ मतांनी मगर यांचा पराभव झाला. आघाडीचे प्रफुल्ल पाटील यांना ४५३ तर महाआघाडीचे चारुहास मगर यांना ३६७ मते प्राप्त झाली. मगर यांचा तब्बल ८६ मतांनी पराभव झाला. आघाडीच्या समीधा गुरव यांना २३०, महाआघाडीच्या रसिका चारुहास मगर यांना १७९ मतांवर समाधान मानावे लागले. गुरव यांचा ५१ मतांनी विजय झाला. आघाडीचे गणेश गावडे यांनी महाआघाडीचे दत्ता भितळे यांचा १९६ मतांनी पराभव केला. आणखी एका प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये आघाडीच्या शोभा भांगरे यांनी २२२ मते मिळवीली.
११ पैकी सहा जागा महिलांसाठी राखीव होत्या. सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहेत.
१आणखी एका प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये आघाडीच्या शोभा भांगरे यांनी २२२ मते मिळवित महाआघाडीच्या प्राजक्ता मंगेश माळी यांचा ५० मतांनी पराभव केला. माळी यांना १७२ मते मिळाली. प्रभाग क्रमांक एकमध्ये आघाडीचा विजय.
२प्रभाग क्रमांक १ आघाडीचे नंदकुमार कदम, समीधा गुरव, शोभा भांगरे विजयी झाले आहेत. प्रभाग २ गणेश गावडे, नम्रता पडियार, प्रभाग तीनमधून प्रफुल्ल पाटील, आरती पाटील, मधुकर थळे विजयी झाले आहेत.
३ प्रभाग ४ अनंत मुळूसकर, सुचिता राऊळ, पूनम वार्डे हे उमेदवार विजयी झाले आहेत. मतदान यंत्रामध्ये ९० मतदारांनी ‘नोटा’ चा पर्याय निवडला होता.वेश्वी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रथमच ५० टक्के महिला आरक्षणाने झाली.
खरवलीत पाचव्यांदा शिवसेना
च्बिरवाडी : महाड तालुक्यातील गु्रपग्रामपंचात खरवली-काळीजवर सलग पाचव्यांदा शिवसेनेचा भगवा कायम राहिला आहे. ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतमोजणीला महाड तहसील कार्यालयात सकाळी १० वा. सुरुवात झाल्यानंतर प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेनेचे उमेदवार जयंत गुडेकर यांना २३१ मते वर तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार नितेश शिर्के यांना केवळ १९ मतांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेच्या महिला उमेदवार दीपाली जाधव यांना २०० मते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा सकपाळ यांना केवळ ५१ मते मिळाली. प्रभाग २ मध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रय पवार यांना २७९ मते तर शिवसेनेचे विजयी उमेदवार विलास तरे यांना ४२१ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवार अपर्णा अनिल येरुणकर यांना ३५४ मते मिळाली आहे. सलग दुसऱ्यांदा विजयी होवून त्यांनी राष्ट्रवादीचे या ठिकाणचे अस्तित्व कायम ठेवले आहे तर शिवसेनेच्या प्राजक्ता कलमकर यांना ३३८ मते मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र नलावडे ३६३ मते मिळवून विजयी झाले आहेत.
शिवसेनेचे राजेश पाटणे यांना ३२८ मते मिळाली आहेत. या प्रभागामध्ये राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवले तर प्रभाग ३ मध्ये शिवसेनेच्या आरती म्हामुणकर यांना ३४२ मते मिळाली असून त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विद्यमान ग्रा.पं. सदस्यांचा पराभव केला आहे. काँग्रेसच्या उमेदवार आरती चैतन्य म्हामुणकर यांना ११९ मतांवर समाधान मानावे लागले आहे तर स्वाती विठ्ठल म्हामुणकर या २७३ मते मिळवून विजयी झाले आहेत.
खरवली ग्रामपंचायतीच्या एकूण १४ जागांसाठी ५ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते तर ८ जागांकरिता थेट मतदान घेण्यात आले. या मतदानामध्ये खरवली ग्रामपंचायतीमधील २००७ मतदारांपैकी १,६३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. खरवली काळीज-ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला उमेदवाराकरिता राखीव आहे.